हॉटेलचा मॅनेजरच निघाला सोनसाखळी चोर

हॉटेलचा मॅनेजरच निघाला सोनसाखळी चोर

Published on

पाठलाग

हॉटेलचा मॅनेजरच निघाला सोनसाखळी चोर

कल्याण- डोंबिवलीत मागील अनेक वर्षांपासून सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. एकामागून एक घटना घडत आहेत. प्रत्येक घटनेत वेगवेगळे आरोपी आहेत. या चोरांना पकडणे म्हणजे पोलिसांसमोर मोठे आव्हानच होते. डोंबिवलीतील एका घटनेत पोलिसांना १७२ सीसीटीव्ही तपासल्यानंतर अखेर लाखो रुपयांचे दागिने लंपास करणारा एक चोर सापडला. हा चोर दुसरा तिसरा कुणी नव्हता तर चक्क एका हॉटेलचा मॅनेजरच निघाला.

संतोष दिवाडकर, कल्याण
कल्याण- डोंबिवली शहरात गेल्या काही महिन्यांपासून एकापाठोपाठ एक सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने क्षणार्धात हिसकावून चोरटे ‘धूम स्टाइल’ने पसार होतात. पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हे वाढत आहेत; मात्र प्रत्येकवेळी गुन्हेगारांचा चेहरा नवा, दुचाकी नवी असते. त्यामुळे पोलिसांसाठी आरोपींचा शोध घेणे हे एकप्रकारचे आव्हान उभे ठाकते. त्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तांनी मॉर्निंग वॉकच्या वेळी सोनसाखळी चोरांसाठी विशेष पथक तयार केले. या पथकाच्या मदतीने नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यांना गुन्हेगार तपासणीसाठी मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे उपाययोजना केली असली तरी हे आरोपी पोलिसांना सहज गुंगारा देत सोनसाखळी चोरी करत होते. २३ जूनला सकाळी साडेसात वाजता ठाकुर्लीतील ९० फूट रोडवर मॉर्निंग वॉकसाठी वेगवेगळ्या वयोगटातील महिला व पुरुष आले होते. याचवेळी सोनसाखळी चोरही दबा धरून आपला सावज शोधत होते. शेवटी त्यांना दावत हॉटेलसमोर आपली दावत मिळाली. त्यांनी एका महिलेला काही कळण्यापूर्वीच तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरीने खेचून तेथून धूम ठोकली. महिलेने आरडाओरडा केला; मात्र कोणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच चोर वाऱ्याच्या वेगाने पसार झाले होते.

घटनेच्या दोन आठवड्यांनंतर पुन्हा ९ जुलैला सकाळी त्याच परिसरात चोर आपले सावज शोधत होते. गळ्यात दागिने असलेल्या बेसावध महिलेचा शोध सुरू झाला. मागील घटनेपेक्षा या वेळी त्यांना सावज शोधायला बराच वेळ लागला. सकाळी आठ वाजता त्याच रस्त्यावर असलेल्या मंजू शहा या ६३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर त्यांची नजर पडली. सोन्याची चमक पाहून त्यांचे डोळे दिपले. शहा यांना काही समजण्यापूर्वीच त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी खेचून चोरटे धूम स्टाइलने पुन्हा पसार झाले. याच भागातील आणखी एका सोनसाखळी चोरीचा गुन्हा डोंबिवली पोलिस स्थानकात नोंदवला गेला.

सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यानंतर ९० फुटी रोड परिसरात सोनसाखळी चोरांची दहशत पसरली होती. काहींनी दागिने घरी ठेवून मॉर्निंग वॉकला सुरुवात केली, तर काहींनी मॉर्निंग वॉकच बंद केले. पोलिसांच्या हाताला हे चोर काही लागणार नाहीत. तसेच गेलेले दागिने आता काही परत मिळणार नाही, असा समज येथील राहिवाशांचा झाला होता. या घटनांनंतर मॉर्निंग वॉक करणारे नागरिक सावध झाले होते. पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आणखीन सखोल तपास सुरू केला, परंतु हे चोरटे प्रत्येक गुन्ह्यात वेगळी दुचाकी चोरून वापरत असल्याने नेमका आरोपी शोधण्यास पोलिसांना अपयश येत होते. तरीही या सोनसाखळी चोरांना काहीही करून बेड्या ठोकायच्या, असा ठाम निर्धार पोलिसांनी केला. चोर पळून गेलेल्या वाटेवरील सगळेच सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. ९० फुटी रोडपासून चोर ज्या चौकातून आणि मार्गातून पळ काढत होते. त्या सर्व चौकातील, दुकानांबाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी निरखून पाहिले. १०-२० नव्हे तर तब्बल १७२ सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांच्या हाताला आरोपींचे धागेदोरे लागले.

तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांना सोनसाखळी चोरीतील आरोपी सापडला. परेश घावरी या ३५ वर्षीय गुन्हेगाराच्या शिताफीने मुसक्या आवळल्या. कल्याण पश्चिममधील शंकरराव चौक येथील कामगार वसाहतीत तो राहात असून, तो एका हॉटेलमध्ये मॅनेजर असल्याचे चौकशीत समोर आले. एका बाजूला चांगली नोकरी करून प्रतिष्ठा मिळवायची, तर दुसरीकडे त्याच चेहऱ्यावर दुसरा मुखवटा चढवून गुन्हे करायचे, हे समीकरण एखाद्या चित्रपटाच्या गूढ कथेतील पात्रासारखेच आहे. दरम्यान, परेशच्या दुहेरी पात्राचा मुखवटा हटविल्यानंतर पोलिसांच्याही भुवया उंचावल्या.

चौकशीदरम्यान आरोपीने केलेल्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख ८० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनी सोनसाखळी, ९० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनी सोनसाखळी, तसेच गुन्ह्यांत वापरलेल्या एक लाख १५ हजार रुपये किमतीची दुचाकी, तर दुसरी एक लाख ७० हजारांची दुचाकी, असा एकूण पाच लाख ५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलिस ठाणे तपास पथक करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com