ठाणे पोलिसांची पकड ढिली
सोनसाखळी चोरीच्या घटनांत वाढ; सहा महिन्यांत ६५ घटनांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : सध्या सोन्याच्या दराने अचानक उच्चांक गाठला असून, ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मात्र ‘धूम स्टाइल’ने सोनसाखळी खेचण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. २०२५ या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत (जानेवारी ते जून) तब्बल ६५ गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी ४५ गुन्हे उघडकीस आले असले तरी २० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना पूर्णतः अपयश आले आहे. त्यामुळे महिलावर्गामध्ये अजूनही चोरट्यांनी दहशत कायम आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ठाणे शहरापासून कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर ते थेट अंबरनाथ, बदलापूर या शहरांपर्यंत पसरलेले आहे. या परिसरातून पायी निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरटे दुचाकीवरून धूम स्टाइलने खेचून चोरटे पसार होतात. जर एखाद्या महिलेने त्या चोरट्यांना विरोध दर्शवल्यास ते त्या महिलेला मारहाण करणे, ढकलून देणे किंवा दुचाकीसोबत फरपटत घेऊन जाणे असे धोकादायक प्रकारही घडले आहेत. अशा दुर्घटनेत अनेकदा महिला गंभीर जखमी होतात, चोरटे मात्र पसार होतात. त्यामुळे अशा चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांसह महिलावर्गातून होत आहे.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ठाणे पोलिस आयुक्तालयात सोनसाखळी चोरीचे गुन्हे आतापर्यंत ६५ दाखल झाले आहेत. यापैकी ४५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. २० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यामध्ये जरी दाखल गुन्हे कमी असले तरी सर्वाधिक पाच गुन्हे उघडकीस आणण्यात भिवंडी परिमंडळाच्या पोलिसांना अपयश आले आहे.
----------------------------
‘वागळे’त सर्वाधिक गुन्हे
शहर आयुक्तालयात असलेल्या पाच परिमंडळामधील वागळे पाचमध्ये तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत, तर ठाणे शहर (१) हे परिमंडळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. नुकताच ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये महिला मंदिरात जात होती. त्या वेळी अचानक चोराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळून गेला.
---------------------------
चोरटे सुसाट
पाच परिमंडळातील वर्तकनगर, नारपोळी आणि कोळसेवाडी या पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी पाच आणि नौपाडा , राबोडी आणि चितळसर या पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी चार गुन्हे दाखल झाले आहेत. याच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात चोरी केल्याचे दिसून येत आहे.
---------------------------------
* जानेवारी ते जून, २०२५ (गुन्ह्यांची संख्या)
परिमंडळ दाखल उकल
ठाणे (१) १५ ११
भिवंडी (२) ०८ ०३
कल्याण (३) १२ ०८
उल्हासनगर (४) १४ ११
वागळे इस्टेट (५) १६ १२
एकूण ६५ ४५
................