थोडक्यात नवी मुंबई
नेरूळ येथील रवि मढवी यांचे ५० वेळा प्लाझ्मा दान
जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : जगात सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अवयवदान मानले जाते. आपल्या दैवी पुराणानुसार अन्नदान, जलदान आणि रक्तदान ही श्रेष्ठ दाने मानले जातात. मात्र कोरोना आपत्तीनंतर प्लाझ्मा दानदेखील सर्वश्रेष्ठ मानण्यात येत आहे. असे प्लाझ्मा दान करणारा अवलिया म्हणून नेरूळ गावच्या रवि मढवी यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात ५० वेळा प्लाझ्मा दान केले आहे. रुग्णांबाबत सद्भावना जागृत ठेवून ते प्लाझ्मा दान करतात. याबाबत रुग्णालयामार्फत त्यांना शनिवार (ता. १९) सन्मानित करण्यात आले. प्लाझ्मा दान म्हणजे आपल्या शरीरातील रक्तातून प्लाझ्मा वेगळा करून गंभीर आजारातील लोकांसाठी वापरला जातो. प्लाझ्मा हे आपल्या रक्तातील महत्त्वाचे द्रव्य आहे. त्यात पाणी, प्रथिने, क्षार व हार्मोन्स असतात. शिवाय रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढवण्याचे काम हा प्लाझ्मा करीत असतो. प्लाझ्मा फेरिसिस प्रक्रियेद्वारे प्लाझ्मा दान केले जाते. प्लाझ्मा दात्याच्या हातातून रक्त घेतले जाते. त्यातून मशीनद्वारे प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि उर्वरित घटक म्हणजे लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स शरीरात पुन्हा पाठवल्या जातात.
किमान ५० किलो वजनाच्या १८ ते ६० वर्षे वयोगटातील लोकांना प्लाझ्मा दान करता येते. प्लाझ्मा नियमित दान केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. शिवाय प्लाझ्मा दोन ते तीन दिवसांत पुनर्निमित होतो. लवकरच फाउंडेशन स्थापन करून अशा प्रकारे रुग्णांना लागणाऱ्या रक्तदानापासून अवयवदानापर्यंत शिबिरे आयोजित करण्याची इच्छा रवि मढवी यांनी व्यक्त केली.
२०१९ साली देशासाठी दूत बनलेल्या रतन टाटा यांची वर्तमानपत्रात बातमी वाचून आपणदेखील समाजऋण म्हणून काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली. त्यामुळे काही मित्रांसह खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालय येथे भेट देऊन रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी तेथील उपस्थित डॉक्टरांनी प्लाझा दानबाबत माहिती देऊन त्यासाठी प्रेरित केले. आम्ही काही मित्र प्लाझ्मा दान करून आलो. पुढच्या वेळी आम्हाला रुग्णालयातून फोन आला, मात्र त्या वेळी मित्रांनी येण्यास नकार दिला. मी मात्र जेव्हा फोन येईल तेव्हा जाऊन प्लाझ्मा दान केल्याने या वेळी माझे ५० वेळा प्लाझ्मा दान झाल्याचे रवि मढवी यांनी सांगितले.
.........
वाशीमध्ये धोकादायक गतिरोधक
जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : वाशी सेक्टर १५ येथील गतिरोधक नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाशी-कोपरखैरणे या रस्त्याच्या पूर्वेला मॉडर्न महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले गतिरोधक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. या ठिकाणच्या ए आणि बी टाइप बैठ्या चाळी, बी १० इमारती, आयसीएल शाळा या सगळ्यांना हा रस्ता वापरावा लागतो. या रस्त्यावर तीन गतिरोधक पालिकेकडून टाकण्यात आले आहेत. मात्र त्याच्यावरील पांढरे पट्टे गेल्याने हे गतिरोधक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
या रस्त्यावरून वेगाने येणाऱ्या वाहनांना गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती वाढली आहे. जनता मार्केटसमोरील मार्केटमधील गर्दीच्या दृष्टीने, आयसीएल शाळेसमोरील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तर गुरुदत्तनगर असोसिएशनसमोरील गतिरोधक ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र यावरील पांढरे पट्टे गेल्या अनेक दिवसांपासून अस्पष्ट झाल्याने वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही.
नियमित रस्त्याचा वापर करणाऱ्या लोकांना अडचणी येत नाहीत. मात्र कधी तरी येणाऱ्या वाहनचालकांची मोठी अडचण होते. त्यामुळे अनेकदा छोटेमोठे अपघाताचे प्रसंग या ठिकाणी उद्भवले आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने ही समस्या मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे.
- सुधाकर शिंदे
............
खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा
उरण, ता. २२ (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला अध्यक्षा उमा संदीप मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा २०२५ उरण तालुक्यातील चिरनेर येथे पी. पी. खारपाटील विद्यालयात पार पडली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंढे, जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रीतम जाधव, उरण तालुका अध्यक्षा कुंदा ठाकूर, उरण तालुका उपाध्यक्षा सुमिता तुपेकर, प्राध्यापिका सुलोचना सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या भारती समाधान कटेकर, उज्ज्वला ठाकूर, सुगंधा कडू, कामिनी ठाकूर, चिर्ले ग्रामसंघ बचत गट अध्यक्षा विश्रांती घरत, साक्षी धुमाळ, जान्हवी पाटील, सीडीपीओ पल्लवी भोईर, उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, उरण विधानसभा अध्यक्ष श्वैजनाथ ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. परीक्षक म्हणून जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रीतम जाधव यांनी भूमिका पार पाडली. या स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये स्नेहा नितीन ठाकूर (चिरनेर) प्रथम क्रमांक, राणी सागर ठाकूर (धुतुम) द्वितीय, प्रणाली प्रवीण घरत (धुतुम) तृतीय, अर्पिता जगदिश जोशी (चिरनेर) चतुर्थ, ज्योती सुरेश म्हात्रे (चिरनेर), आश्विनी ज्ञानेश्वर ठाकूर (धुतुम) यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
..........
ऐरोलीत रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूककोंडी
वाशी, ता. २२ बातमीदार : ऐरोली नॉलेज पार्क सिटीमधील मुख्य रस्त्यावर बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे ऐरोली नॉलेज पार्क सिटीमधील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. रस्त्याच्या विरुद्ध बाजूने रिक्षाचालक रिक्षा चालवत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे.
ऐरोली नॉलेज पार्क सिटीमधील मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा बसेसे पार्किंग करण्यात येत असतात. त्यातच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम हा ऐरोली नॉलेज पार्क सिटीमधील रस्त्यावर होत असून, ऐरोलीकडून दिघा गाव रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे रिक्षाचालकदेखील दिघा गाव रेल्वे स्थानकांकडून ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावर विरुद्ध बाजूने रिक्षा चालवत आहेत. संध्याकाळच्या वेळेस ऐरोली नॉलेज पार्क सिटीमधील आयटी कंपन्यांच्या गेटवरच रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षा पार्किंग करीत असून, विरुद्ध बाजूने रिक्षा चालवतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. यामुळे ऐरोली नॉलेज पार्कमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील मुख्य रस्त्यावर पार्किंग करण्यात जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी तसेच बेशिस्तपणे विरुद्ध बाजूने वाहन चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.