हरिहरेश्वर येथील पोलीस चौकीचे लवकरच नुतनीकरण होणार

हरिहरेश्वर येथील पोलीस चौकीचे लवकरच नुतनीकरण होणार

Published on

हरिहरेश्वर पोलिस चौकीचे लवकरच नूतनीकरण होणार
रायगडचे पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घेतली दखल
श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) : सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या हरिहरेश्वर येथील पोलिस चौकीचे लवकरच नूतनीकरण होणार आहे. गेली काही वर्षे बंद अवस्थेत असलेली ही चौकी ‘निसर्ग’ चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनंतर रायगडचे पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी तातडीने दखल घेत नूतनीकरणाच्या प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे.
हरिहरेश्वर किनाऱ्याला लागून असलेल्या सुमारे ५८ कि.मी. लांबीच्या सागरी परिसरात सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने ही चौकी अत्यावश्यक आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर जुलै १९९६ मध्ये स्थापन झालेल्या चौकीस हरिहरेश्वर ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली होती, परंतु काही काळातच मनुष्यबळाअभावी ती बंद झाली. २०१८ रोजी स्थानिकांच्या पुढाकाराने ही चौकी पुन्हा कार्यरत झाली होती, मात्र ‘निसर्ग’ वादळात झालेल्या नुकसानामुळे पुन्हा ती निष्क्रिय झाली. या चौकीची डागडुजी माजी सरपंच अमित खोत, सुयोग लांगी आणि ग्रामस्थांनी स्वखर्चाने केली होती. काही काळ दोन पोलिस कर्मचारी तैनातही होते, मात्र पुन्हा मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ती बंदच राहिली. यासंदर्भात श्रीवर्धन उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी नुकतीच चौकीची पाहणी केली. या वेळी माजी नगराध्यक्ष फैसल हुर्जुक, माजी सरपंच अमित खोत, उपसरपंच सुयोग लांगी, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी चौकी आणि परिसराची स्वच्छता केली असून, आवश्यक असल्यास आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
.................
कोट
पोलिस चौकी नूतनीकरणाचे काम आम्ही प्राधान्याने हाती घेतले असून, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच काम सुरू होईल. सीएसआर आणि डिपीडीसी निधीमधून आर्थिक तरतूद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चौकी अद्ययावत करून आवश्यक मनुष्यबळ तैनात केले जाईल.
- सविता गर्जे, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीवर्धन
................
हरिहरेश्वर पोलिस चौकी का गरजेची?
१९९३ : मुंबई बॉम्बस्फोटात वापरलेले आरडीएक्स शेखाडी (श्रीवर्धन) येथे उतरवण्यात आले होते. त्यामुळे किनारपट्टी असुरक्षित वाटू लागली.

१८ ऑगस्ट २०२२ : हरिहरेश्वर समुद्रकिनारी संशयास्पद बोट आढळली. त्यात अत्याधुनिक रायफल्स व काडतुसे सापडली.

१९ ऑक्टोबर २०२४ : खोली भाडे वादातून पर्यटकांनी स्थानिक महिलेला वाहनाखाली चिरडून ठार मारले.

वाढते पर्यटन : पर्यटक व स्थानिकांमध्ये वेळोवेळी वाद निर्माण होत असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस चौकी अत्यावश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com