चित्रकला ग्रेड परीक्षांचे शुल्क दुप्पट – ग्रामीण विद्यार्थ्यांना बसतोय अन्यायाचा भुर्दंड

चित्रकला ग्रेड परीक्षांचे शुल्क दुप्पट – ग्रामीण विद्यार्थ्यांना बसतोय अन्यायाचा भुर्दंड

Published on

चित्रकला ग्रेड परीक्षांचे शुल्क दुप्पट
ग्रामीण विद्यार्थ्यांना बसतोय अन्यायाचा भुर्दंड
कासा, ता. २३ (बातमीदार) ः कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्याचे धोरण असतानाही महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने एलिमेंटरी आणि यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिक्षणतज्ज्ञ, कला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातून या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, निषेधाचे सूर उमटत आहेत.
चित्रकला परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधीच रंगसाहित्य, वह्या, प्रवासखर्च आदी गोष्टींसाठी मोठा खर्च करावा लागतो. अशा वेळी शुल्कवाढ ही गरीब विद्यार्थ्यांना परीक्षेपासून दूर लोटणारी ठरत आहे. विशेषतः दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, त्यांच्याकडे कला शिक्षकच उपलब्ध नसल्याने ही अडचण अधिक गंभीर बनली आहे.
या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना शालेय गुणांमध्ये वाढ मिळत होती, मात्र सध्याच्या सुधारित प्रणालीमध्ये ए ग्रेडसाठी १५ ऐवजी सात गुण, बीसाठी १० ऐवजी पाच आणि सी ग्रेडसाठी सातऐवजी केवळ तीन गुण दिले जात आहेत. या बदलांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेबाबतचा रस कमी होत चालल्याचे शिक्षकांचे निरीक्षण आहे. यामुळे कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन मिळण्याऐवजी अडथळे निर्माण होत आहेत. ही परीक्षा आधीपासून ऑनलाइन माध्यमातून घेतली जात असून, प्रश्नपत्रिका, प्रमाणपत्रे व नोंदणीसाठी डिजिटल व्यवस्था आहे. त्यामुळे शुल्कवाढीचे कारण काय, हा प्रश्न पालक आणि शिक्षक विचारत आहेत.
राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बराई म्हणाले, ही शुल्कवाढ अन्यायकारक आहे. शिक्षणाचे मूलभूत तत्त्व समजून घेऊन शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

आयुष्यात चांगले जीवन जगण्यासाठी कलेचे शिक्षण आवश्यक आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना कलात्मकतेकडे वळवले पाहिजे. कल्पना, भावना आणि सृजन या माध्यमातूनच व्यक्त होतात. गोरगरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी अडचण निर्माण होते.
- राजेश वांगड, आंतरराष्ट्रीय वारली चित्रकार

मानधनच नाही
या परीक्षांसाठी काम करणाऱ्या परीक्षा केंद्रांना मानधनही गेल्या अनेक वर्षांपासून मिळाले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे परीक्षा व्यवस्थापनात असलेला बकालपणा आणि अनागोंदीदेखील समोर येत आहे.

कला शिक्षकांची टंचाई
सद्यःस्थितीत शाळांमध्ये कला विषयाला फारसे महत्त्व उरलेले नाही. अनेक शाळांमध्ये कला शिक्षकांची भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांना या विषयाचे योग्य प्रशिक्षण मिळत नाही. शासनाने जर याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर काही वर्षांत शालेय पातळीवर चित्रकलेसारखा विषय पूर्णतः रसातळाला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दुप्पट वाढ
या परीक्षांचे शुल्क पूर्वी एलिमेंटरीसाठी ५० आणि इंटरमिजिएटसाठी १०० रुपये इतके होते, मात्र यावर्षी हे शुल्क अनुक्रमे १०० आणि २०० रुपये इतके करण्यात आले आहे. राज्य सरकारचे कौशल्यावर आधारित शिक्षण धोरण हे प्रत्यक्षात फसवे ठरत असल्याचा आरोप होत आहे. राज्यभरातून शिक्षक, विद्यार्थी, पालक, कलाप्रेमी आणि विविध संघटनांकडून ही शुल्कवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

फोटो...
राजेश वांगड आंतरराष्ट्रीय वारली चित्रकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com