
थोडक्यात बातम्या रायगड
रायगड जिल्ह्यातील तीन कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट डिग्री प्रदान
अलिबाग (बातमीदार) : नागाव येथील संचालक मंडळ नागाव हायस्कूल येथे इंडियन ओकिनावा शोरीन रियू क्युडोकान कराटे-डो इंडियाच्या वतीने ब्लॅक बेल्ट व कलर बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले. रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण ३८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. अलिबाग तालुक्यातील नागाव येथील संचालक मंडळ नागाव हायस्कूलमध्ये प्रशिक्षण घेणारे ईशान पोवळे (नागाव), तनिष पाटील (नवेदर बेली) व दुर्वा नाईक (आक्षी) या तीन विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली. हे विद्यार्थी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी झाले असून, त्यांनी इंडियन ओकिनावा शोरीन रियू क्युडोकान कराटे-डो इंडियाच्या अंतर्गत सातत्याने सराव केलेला आहे.
..............
माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते व्यायामशाळेच्या इमारतीचे लोकार्पण
रोहा (बातमीदार) : रोहा अष्टमी नगर परिषदेअंतर्गत असलेल्या मार्तंड व्यायामशाळेच्या नूतनीकरण व नवीन उपकरणांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम बुधवारी (ता. २३) सायंकाळी पार पडला. हा लोकार्पण सोहळा माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमामुळे तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, माजी उपाध्यक्ष मयूर दिवेकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
......................
इशिका शेलार यांची खालापूर तालुका महिला विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
खालापूर (बातमीदार) : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या खालापूर तालुका महिला विभागाच्या अध्यक्षपदी इशिका शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान, तसेच मानवी हक्कांविषयी असलेली तळमळ लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली. शाळाबाह्य व वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी झाडाखाली सुरू केलेल्या शिक्षण उपक्रमाचे जिल्हा स्तरावर कौतुक झाले होते. इशिका शेलार या महिला विभागाच्या जबाबदाऱ्या पार पाडून फेडरेशनच्या कार्याचा विस्तार व लोकजागृतीसाठी सक्रियपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
................
गटारीनिमित्त पोयनाड परिसरात चिकन-मटणाला प्रचंड मागणी
पोयनाड (बातमीदार) : श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी बुधवारी (ता. २३) गटारी अमावस्या साजरी केली. यानिमित्ताने पोयनाड परिसरात चिकन व मटण खरेदीसाठी खवय्यांनी मोठी गर्दी केली होती. पुढील महिनाभर श्रावण महिना व त्यामधील व्रतवैकल्य आणि उपवास असल्याने बुधवारी अनेक ठिकाणी मांसाहाराला प्राधान्य देण्यात आले. श्रीगाव, पेझारी व पोयनाड येथील मटण दुकानांसमोर पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. मटणाचे दर ७०० रुपयांपर्यंत गेले असले तरी खवय्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद असल्याने माशांची अनुपलब्धता होती, त्यामुळे चिकन-मटणाला पसंती मिळाली. चिकन व मटण बिर्याणीचीदेखील जोरदार मागणी दिसून आली.
................
वडघर मुद्रे विद्यालयात आरोग्य शिबिर
माणगाव (बातमीदार) : श्री प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे विद्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन सोमवारी (ता. २१) करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भाजप माणगाव तालुका चिटणीस राजीव परांजपे, युवा मोर्चा अध्यक्ष सुयश मोने, माजी उपाध्यक्ष कौस्तुभ वझे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरात ४५ विद्यार्थ्यांची व १५ पालकांची मोफत तपासणी करण्यात आली. काही गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात पाठविण्यात आले. शाळेत देशी औषधी वनस्पतींची लागवडही करण्यात आली. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी व मान्यवर नागरिक यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी माणगाव तालुका निजामपूर मंडळ अध्यक्ष युवराज मुंढे, माजी माणगाव तालुका उपाध्यक्ष आनंद राजभर, समाजसेवक भावेश जोशी, ॲड. नंदकुमार मराठे, गोरेगावचे उद्योजक नीलेश केसरकर, समाजसेवक अक्षय मोरे, माजी महिला तालुकाध्यक्षा अश्विनी कडू, गोरेगावमधील कृषिमित्र हर्षदा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. विनीत पांडे, डॉ. स्नेहल पवार, डॉ. अभिजित कुलकर्णी, साई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप भालके, तसेच माणगाव तालुक्यातील वैद्यकीय कर्मचारी वर्ग, तालुका उपजिल्हा रुग्णालयातील दर्पण मोरे, संजय देसाई यांचे विशेष सहकार्य लाभले.
..................
कुणबी समाज साले ग्रुपतर्फे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन
माणगाव (बातमीदार) ः माणगाव तालुका कुणबी समाज साले ग्रुप यांच्यातर्फे दहावी व बारावीमध्ये ६५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता कुणबी भवन माणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी कुणबी समाज साले ग्रुपतर्फे समाजातील दहावी व बारावी परीक्षेत ६५ टक्क्यांहून अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीही साले ग्रुपतर्फे रविवारी सकाळी ११ वाजता कुणबी भवन माणगाव येथे या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाजाच्या दहावी व बारावीत ६५ टक्क्यांहून अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स कुणबी भवन माणगाव येथे रवींद्र अर्बन यांच्याकडे शनिवार (ता. २६)पर्यंत जमा करावी, असे आवाहन समाजाचे ज्येष्ठ नेते तथा साले ग्रुपचे सल्लागार महादेव बक्कम व ग्रुपचे अध्यक्ष भागोजी डवले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.