ओला उबर चालकांच्या व्यथा
ओला, उबरचालकांवर कर्जाचा डोंगर
कुणी १८ तोळे सोने गमावले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : काही वर्षांपूर्वी ओला, उबरमध्ये वाहन लावले तर महिन्याकाठी हमखास चांगले उत्पन्न मिळायचे; मात्र अलीकडे ही परिस्थिती बदलली आहे. आरटीओने निश्चित केलेल्या दराच्या तुलनेत अत्यल्प रक्कम टॅक्सीचालकांना मिळत असल्याने कर्ज काढून वाहन खरेदी केलेले अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच त्यांचे भविष्यही अंधारात आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या ओला, उबर चालकांच्या संपामुळे ॲपआधारित टॅक्सीसेवेतील प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अनेकांनी या सेवेसाठी नवी कोरी वाहने घेतली; मात्र आता उत्पन्न घटल्याने कर्ज फेडणे कठीण होत चालले आहे.
सागर लेंढे यांनी घरातील १७ तोळे सोने गहाण ठेवून उर्वरित कर्ज काढून एसयूव्ही गाडी घेतली. ती उबेरमध्ये लावली; मात्र एसयूव्ही गाडीला १३ किमीसाठी २५० ते ३०० रुपये दिले जात आहे. तुटपुंजे पैसे येत असल्यामुळे कर्ज फेडणे कठीण झाले आहे. गहाण सोने सोनाराकडे पडले आहे. रस्ता कर, पॅनिक बटण, भाड्यावर जीएसटी इत्यादी खर्च आहे. त्यामुळे वडिलांना ७०व्या वर्षी कामाला जावे लागते, असे सागर यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून ॲपआधारित टॅक्सीसेवा देत असलेल्या अमजद खान यांनी सांगितले, की मुंबईतील वाहतूक कोंडी पाहता इंधन खर्च जास्त येतो. १० किमी प्रवासासाठी एक तासाहून अधिक वेळ लागतो. त्यासाठी १५० ते ३०० रुपये देतात. त्यातच सीएनजीचा खर्च जातो. त्यामुळे कर्जाचा हप्ता, इंधन खर्च, घरखर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आमच्यापुढे असल्याचे खान यांनी सांगीतले.
माझ्या १० वर्षांच्या मुलाला कर्करोग झाला आहे. त्याच्या उपचारासाठी पैसे नाहीत. घरभाडे, गाडीचा हप्ता आणि घरखर्च आहे. परंतु कामाच्या तुलनेत मिळणारा मोबदला कमी आहे. पूर्वी आठ तास काम करून खर्च भागत होता, पण आता १५ तास काम करूनही तुटपुंजा मोबदला मिळत आहे.
- विक्रांत म्हादये , टॅक्सीचालक
आरटीओने निश्चित केलेले दर लागू करा
राज्यभरात सर्व ॲपआधारित वाहनांची संख्या १८ लाख असून, त्यावर १८ लाखांहून अधिक चालकांचे घर चालते. सुरुवातीच्या काळात ॲपआधारित वाहनचालकांना कंपन्यांनी अनेक प्रलोभने दिली, परंतु आता त्यांच्याकडून प्रति किमी कमी भाडे दिले जाते. या चालकांना प्रति किमी ८ ते १२ रुपये मिळतात. याउलट प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेल्या दराच्या तुलनेत अत्यल्प रक्कम चालकांना मिळते. त्यामुळे सर्व ॲपआधारित सेवा सुरू राहावी, यासाठी ॲग्रीकेटर कंपन्यांनी आरटीओने निश्चित केलेले दर लागू करावे, अशी मागणी केली जात आहे.
==
काय आहेत मागण्या ?
- प्रतिकिलोमीटरवर दर मिळावा
- बुकिंगचा ३० ते ४० टक्के वेळ वाढतो, मात्र वेटिंग चार्ज मिळत नाही.
- कॅन्सलेशन चार्जेस नको
- सरचार्ज नको
- रस्त्यावर काही वेळेसाठी गाडी उभी केली तर होणारी कारवाई थांबवा
- चालकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.