संसर्गजन्य तापाच्या रुग्णात वाढ

संसर्गजन्य तापाच्या रुग्णात वाढ

Published on

संसर्गजन्य तापाच्या रुग्णांत वाढ
उपजिल्हा रुग्णालयावर ताण; पालिकेच्या दुबे रुग्णालयात सुविधांचा अभाव

मोहिनी जाधव
बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. बदलापुरात संसर्गजन्य तापाचे रुग्ण वाढल्याचे चित्र समोर येत आहे. त्यात स्थानक परिसरात पालिकेचे दुबे रुग्णालय आहे; मात्र या ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याची तसेच इतर सुविधांअभावी डेंगी, मलेरिया किंवा इतर पावसाळी आजार असल्यास बदलापूर पूर्वेकडील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांना जावे लागते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.

पावसाळा सुरू झाला की दिवसाला हजारपेक्षा अधिक रुग्ण येतात, त्यात निदान तीनशे ते चारशे रुग्ण हे ताप, सर्दी, खोकल्याचे असतात. त्यातून जास्त गंभीर परिस्थिती असण्याची लक्षणे निदान ३० ते ४० रुग्णांना तरी जाणवत असतात. तसेच ग्रामीण भागात राहणारे नागरिक रुग्णालय लांब असल्याने बरेचदा त्रास अंगावर काढतात. त्यामुळे हा त्रास बळावतो आणि रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते. त्यामुळे निदान पालिकेच्या दुबे रुग्णालयात या सुविधा करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

बदलापूर पूर्वेकडील अंबरनाथ आणि बदलापूर या शहराच्या मधोमध असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात दोन्ही शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक उपचारासाठी येतात. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. सध्या असेच वातावरण असल्याने बदलापूर व आजूबाजूच्या परिसरात संसर्गजन्य तापाचे रुग्ण वाढले असून, उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दोन्ही शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी, सात एमबीबीएस डॉक्टर, याव्यतिरिक्त १२ अधिपरिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचारी, अशी एकूण ३५ जणांची कुमक या रुग्णालयात देण्यात आली आहे.

बदलापूर शहरात पालिकेचे दुबे रुग्णालय सुद्धा आहे; मात्र या रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने त्यात अंतररुग्ण उपचारासाठी सुविधा नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ताण पडतो. रुग्णांना आपल्या तपासणीची वेळ येईपर्यंत एका रुग्णाला दीड ते दोन तास थांबावे लागत आहे. तसेच गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी येत असतात, श्वानदंश, सर्प किंवा विंचू दशांचे रुग्ण, टीबी रुग्ण या ठिकाणी उपचार आणि औषधे घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे पालिकेच्या दुबे रुग्णालयात डॉक्टरांची व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, तसेच अंतर रुग्ण दाखल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मी रोज रिक्षा चालवतो आणि माझ्या कुटुंबाचा संपूर्ण भार सांभाळतो. त्यामुळे आजारपण आले की महागडे उपचार परवडत नसल्यामुळे पालिकेचे दुबे रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. उपजिल्हा रुग्णालय येथे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहराच्या मध्यावर आहे. हे अंतर खूप लांब पडते, या ठिकाणी जाणेसुद्धा खर्चिक आहे. त्यामुळे पालिकेच्या दुबे रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयासारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
कमल दुबे, रिक्षाचालक

रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. पावसाळी आजार बळावले आहेत. रुग्णालयात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अशी ३५ कर्मचारी असून, आम्ही सगळ्या प्रकारच्या सुविधा रुग्णांना देत असतो. अनेकदा संसर्गजन्य रुग्ण, इतर आजार, श्वानदंश, गर्भावती महिलांची तपासणी असे सगळा भार एकत्र येतो, तेव्हा आमचीसुद्धा दमछाक होते; मात्र आम्ही तेवढ्याच ऊर्जेने रुग्णांना उपचार आणि धीर देत असतो.
- ज्योत्स्ना सावंत, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com