येऊरमधील हुल्लडबाजीला चाप

येऊरमधील हुल्लडबाजीला चाप

Published on

येऊरमधील हुल्लडबाजीला चाप
रोषणाई, ध्वनिक्षेपक, फटाके वाजवण्यास मनाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येणाऱ्या येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि वाढत्या हुल्लडबाजीमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेने आता कठोर कारवाईचा निर्णय घेतला असून, बंगले, हॉटेल, ढाब्यांवरील प्रखर रोषणाई, ध्वनिक्षेपकांचा वापर आणि फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यासोबतच पार्ट्या आणि लग्नसोहळ्यात वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांना सक्त मनाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर प्रखर रोषणाई करणाऱ्या दिव्यांनाही लागणारा उच्च दाबाचा विद्युत पुरवठा न करण्याचे निर्देश वीज कंपन्यांना देण्यात आले आहेत.

येऊर हे निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने परिपूर्ण क्षेत्र असूनही गेल्या काही वर्षांत येथे अनधिकृत बंगल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अनेक बांधकामांना वीज, पाणी अशा नागरी सुविधा पुरवल्या जात असल्याने परिसरातील वनसंपदा आणि वन्यजीव धोक्यात आले आहेत. अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींनी वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या; परंतु फारशी कारवाई झालेली नव्हती; मात्र पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजल्यावर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

येऊर परिसरात थातूरमातूर कारवाईव्यतिरिक्त काहीच होत नसल्याने येऊर म्हणजे धिंगाणा घालण्याचा अड्डा बनला आहे. याकडे पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी लक्ष वेधले होते, त्यानंतर येथे कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांनी खासगी बंगले मालकांनी त्यांच्या जागेत अवास्तव रोषणाई करू नये, ध्वनिक्षेपक वापरू नये आणि फटाकेही फोडू नये, असे सक्त निर्देश दिले आहेत.

येऊर हे अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. वायू सेनेकडूनही तेथील बांधकामे, रोषणाई याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. त्यावर तत्काळ कारवाई करावी. तसेच या क्षेत्रात प्रखर क्षमतेचे दिवे वापरणेही प्रतिबंधित आहे. त्यामुळे उच्च दाब क्षमतेचा वीजपुरवठा देताना दक्षता घेण्याचे निर्देश महापालिकेकडून महावितरण कंपनीला जातील, असेही आयुक्त राव यांनी या वेळी सांगितले.

कारवाईचा बडगा
१. येऊर येथील टर्फच्या १० बांधकामांपैकी आठ बांधकामे यापूर्वीच निष्कासित करण्यात आली होती. एक टर्फ अधिकृत असून उर्वरित एका टर्फला दिलेली मुदत संपल्याने त्याच्या निष्कासनाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी या बैठकीत दिली.

२. विविध प्रकरणात १८८ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. तर फटाके फोडणे, ध्वनिक्षेपक वापरणे आदी प्रकरणांत १८ गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (परिमंडळ पाच) प्रशांत कदम यांनी दिली.

पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश
येऊरमधील रोषणाई आणि आवाजामुळे येथील शांतता भंग पावली असून त्याचा परिणाम वन्यजीवांवर होत असल्याची याचिका पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. त्यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेने येऊरमधील अवैध कारवायांवर जरब बसविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन झालेल्या या समितीत महापालिका, वन विभाग, पोलिस, वायू सेना, महसूल, अन्न व औषध प्रशासन, महावितरण यांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल, असे आयुक्त राव यांनी सांगितले.


प्रत्यक्षात सुरू झालेली कारवाई
१० टर्फपैकी आठ अनधिकृत टर्फ निष्कासित
१८८ जणांना नोटीस
१८ गुन्हे नोंद - ध्वनिप्रदूषण, फटाके इत्यादी प्रकरणे

समन्वय समितीचा आराखडा
अध्यक्ष : ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त
सदस्य : वन विभाग, पोलिस, वायू सेना, महसूल, अन्न व औषध प्रशासन, महावितरणचे अधिकारी व स्वयंसेवी संस्था

Marathi News Esakal
www.esakal.com