फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या  तीन पुस्तकांचे प्रकाशन

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन

Published on

‘फादर दिब्रिटो यांच्या साहित्यातून मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांची पायाभरणी’
करुणा गोखले यांचे प्रतिपादन
विरार, ता. २६ (बातमीदार) ः फादर दिब्रिटो यांचे साहित्य मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांची पायाभरणी करते, म्हणून तरुणांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. त्यांनी आपल्या साहित्यातून सर्वधर्मसमभावाचे आणि सामाजिक सौहार्दतेचे विचार मांडले आहेत. त्यांचे साहित्य हे तावूनसुलाखून वैचारिक मुशीतून निघालेले आहे. फादर दिब्रिटो यांनी भक्तीला सामाजिकतेची जोड आणि मराठी भाषेत अनेक मोहक शब्दांची भर घातल्याचे प्रतिपादन राजहंस प्रकाशनच्या संपादक करुणा गोखले यांनी स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सुवार्ता मासिकाचे माजी संपादक दिवंगत रे. फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांचा प्रथम स्मृतिदिन शुक्रवारी (ता. २५) नंदाखाल येथे साजरा केला. वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थाॅमस डिसोजा यांच्या पौरोहित्याखाली प्रथम पवित्र मिस्सा अर्पण करण्यात आली. त्यानंतर चर्च हाॅलमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो लिखित तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले.
फादर रेमंड रुमाव म्हणाले, की फादर दिब्रिटो आपल्यामधून गेले असले तरी ते चाफ्याच्या सुगंधाप्रमाणे आपल्याभोवती दरवळत आहेत. वसईला फादर दिब्रिटो लाभले हे आपले भाग्य होते. ते प्रवाहाविरुद्ध गेले, अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. चांगल्या गोष्टींसाठी झटत राहा, हीच दिब्रिटो यांची प्रेरणा आहे. या वेळी प्रथम ‘सर्वोत्तम व समकालीन फादर दिब्रिटो’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष फ्रान्सिस डिमेलो यांच्या हस्ते झाले.
‘नाही मी एकला’ या फादर दिब्रिटो लिखित मराठी आत्मचरित्राच्या ‘आय एम नॉट अलोन’ या इंग्रजी आवृत्तीचे विमोचन सुवार्ता मासिकाचे संपादक फा‌दर (डाॅ.) जोएल डिकुन्हा यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाविषयी बोलताना जोएल डिकुन्हा म्हणाले, की फादर दिब्रिटो यांच्या मनातले हेरून कपिल केळकर यांनी सुंदररीत्या इंग्रजी अनुवाद केलेला आहे. या पुस्तकातील चौदा प्रकरणे म्हणजे एकावर एक रचलेले आधारस्तंभ आहेत. साध्या, सोप्या, ओघवत्या इंग्रजी भाषेत अनुवाद केलेला आहे. फादर दिब्रिटो म्हणजे मुक्तीचे तत्त्वज्ञान जगणारे धर्मगुरू होते. फादर दिब्रिटो यांच्या आत्मचरित्राच्या ई-बुकचे प्रकाशन फादर ॲण्ड्रू राॅड्रिग्ज यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्रबोधन प्रतिष्ठान आणि फादर दिब्रिटो यांच्या कुटुंबीयांनी केले होते. या कार्यक्रमाला पाऊस असूनही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com