सहा महिन्यांत १४२ अल्पवयीन बेपत्ता
सहा महिन्यांत १४२ अल्पवयीन बेपत्ता
मुलींचे प्रमाण अधिक, पोलिसांना ९० टक्के मुलांचा शोध लावण्यात यश
भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : घरातील वाद, परीक्षेतील अपयश, प्रेमसंबंधात फसवणूक आणि पालकांशी तुटलेला संवाद यांसारख्या कारणांमुळे भिवंडी शहरात अल्पवयीन मुले आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील सहा महिन्यांत १४२ अल्पवयीन मुले, मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यामध्ये ९५ मुली आणि ४७ मुले यांचा समावेश आहे. यातील १२६ जणांचा शोध पोलिसांनी लावला आहे, तर १६ जण अद्याप बेपत्ता आहेत.
अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. शालान्त परीक्षांचे निकाल लागल्यानंतर परीक्षेत कमी मार्क पडल्यास घरातील पालक रागावतात. अशावेळी अनेकदा मुले घर सोडून जात असतात. तसेच मुलांच्या वाढलेल्या अपेक्षा कुटुंबीयांकडून पूर्ण न झाल्यास मुले घर सोडून निघून जातात. अनेकदा अल्पवयीन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले जाते. यामुळे मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढतात.
बऱ्याच वेळा बेपत्ता झालेल्या मुली या परराज्यात पळवून नेल्या जातात. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर शोधण्यासाठी ताण येतो. शहरातून जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात १४२ अल्पवयीन मुले, मुली बेपत्ता झाले. त्यामध्ये ४७ मुले तर ९५ मुलींचा समावेश आहे. यापैकी ४४ मुले व ८२ मुली यांचा स्थानिक पोलिसांनी शोध लावला आहे. तर तीन मुले आणि १३ मुली असा १६ जणांचा शोध लागणे बाकी आहे. विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या अनेक मुली या परराज्यात घेऊन गेल्याने अनेकांचा शोध परराज्यातून पोलिस यंत्रणेने लावल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बारोट यांनी दिली आहे.
शोधासाठी स्वतंत्र पथक
शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात बेपत्ता अल्पवयीन मुला, मुलींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. अनेक प्रकरणांत अल्पवयीन पीडितांचा परराज्यातून शोध घेण्यात येतो. भिवंडी परिमंडळ क्षेत्रात बेपत्ता मुला, मुलींचा शोध गांभीर्याने घेतला जात असल्याने तपासाचे प्रमाण ९० टक्के आहे. अशा बेपत्ता पीडितांचा शोध घेऊन त्यांना परत आणल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. बऱ्याच वेळा मुलींचे बेपत्ता काळात शारीरिक शोषण झाल्याचे समोर येते. अशा प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलींची शारीरिक तपासणी करून पोस्कोअंतर्गत गुन्हेसुद्धा दाखल केले जातात, अशी माहिती पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.
अत्याधिक मोबाईल वापर, ओटीटी माध्यमांवरील अतिनाट्यमय आशय, पालक-मुलांमधील संवादाचा अभाव आणि अमली पदार्थांची सहज उपलब्धता या सगळ्यांमुळे अल्पवयीन मुलांमध्ये स्वैरता आणि बंडखोरी वाढली आहे. १५-१८ या वयोगटात स्वनिर्णय घेण्याची क्षमता नसतानाही मुले मोठे निर्णय घेतात आणि ते अयोग्य ठरतात.
आजकाल १५व्या वर्षातच मुलामुलींमध्ये परिपक्वता येते. १५ ते १८ या वयोगटात प्रेमप्रकरणे वाढीस लागतात. त्यामुळे आम्हाला सर्व समजते या आविर्भावात वावरताना मुलांचे अनेक निर्णय चुकतात. यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. तसेच ते वापरीत असलेली माहितीची साधने तपासणे, त्यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- डॉ. विजय तेली, मानसोपचारतज्ज्ञ ठाणे जिल्हा रुग्णालय
............................
बेपत्ता शोध शिल्लक
मुले ४७ ४४ ०३
मुली ९५ ८२ १३
एकूण १४२ १२६ १६
.....................
बेपत्ता होण्याची मानसिक व सामाजिक कारणे
मोबाईलचा अति वापर आणि चुकीची माहिती
कमी संवाद, पालक व मुलांमध्ये संवादाचा अभाव
ओटीटी/टीव्हीवरील नाट्यात्मक कल्पनांवर विश्वास
अमली पदार्थांची सहज उपलब्धता
वय १५-१८ मध्ये प्रेमप्रकरण व स्वैर निर्णय
....................
महत्त्वाचे मुद्दे
प्रेमप्रकरण, घरातील वाद, परीक्षेचा ताण ही प्रमुख कारणे
मुलींचे प्रमाण अधिक - अनेक प्रकरणांत मुली परराज्यात आढळल्या
शोध लागल्यानंतर समुपदेशन व कायदेशीर प्रक्रिया
काही प्रकरणांत पोस्कोअंतर्गत गुन्हे नोंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.