थाोडक्‍यात पट्टा रायगड

थाोडक्‍यात पट्टा रायगड

Published on

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत कनकेश्वर येथे वृक्षारोपण
अलिबाग (वार्ताहर) ः अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर येथे ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, प्रिझम सामाजिक संस्था आणि स्वयंसिद्धा संचालित स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त तपस्वी गोंधळी यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
...............
नागावमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
अलिबाग (वार्ताहर) ः नागाव येथील डॉ. सचिन राऊळ व ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विकासकामांवरील विश्वास आणि नेतृत्वावर निष्ठा यामुळे हा प्रवेश करण्यात आला. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला पक्षप्रवेश राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.
.....................
खंडाळे येथे दहीहंडी सराव शिबिर
अलिबाग (वार्ताहर) ः खंडाळे येथील बापदेव गोविंदा पथकातर्फे २ ऑगस्ट रोजी दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अदिती नाईक-दळवी यांच्या पाठिंब्याने होणाऱ्या या शिबिरात महिला व पुरुष गोविंदा पथकांसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अर्जासाठी अंतिम तारीख ३० जुलै आहे. शिबिरामध्ये आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. यामध्ये महिला गोविंदा पथकाकरिता चार थरांच्या सलामीसाठी १,१०० रुपये तर अंतिम विजेत्या महिला गोविंदा पथकासाठी ११ हजार रुपये, त्याचप्रमाणे पुरुष गोविंदा पथकाला सहा थरांच्या सलामीसाठी २,१०० रुपये तर अंतिम विजेत्या पुरुष गोविंदा पथकासाठी २१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी हिमांशू म्हात्रे (८००७९८९६९३), सुयोग पाटील (७७४४०९४९२९), योगेश पाटील (९१३०८१७४३४) किंवा प्रफुल्ल पाटील (९१५६८४१४९४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
................
आरडीसीएच्या मैदानासाठी शर्थीचे प्रयत्न करणार
पोयनाड (बातमीदार) : आरडीसीएला स्वतःचे मैदान नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध वयोगटांतील मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धा, सराव शिबिरे यासाठी जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडील किंवा खासगी क्लबकडील मैदानांवर अवलंबून राहावे लागते व या मैदानांची उपलब्धता ही काही मर्यादित दिवसांसाठी असते. सर्व बाबींवर मात करण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्वतःच्या हक्काचे मैदान मिळावे, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत, यासंदर्भात नुकतेच आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. आरडीसीएच्या वतीने देण्यात आलेल्या प्रस्तावावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात कुठेही महाराष्ट्र शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी, यासाठी आपण शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आरडीसीएला दिले. यासंदर्भात येत्या आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आपण भेट घेऊन त्यांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने निवेदन प्रस्ताव देणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
............
मुरूडमध्ये मच्छीविक्रीमुळे वाहतूक कोंडी
मुरूड (बातमीदार) ः मुरूड मच्छी मार्केटसाठी नगर परिषदेने भव्य इमारत उभारली असली तरी विक्रेत्या महिलांनी रस्त्यावरच विक्री सुरू ठेवली आहे. यामुळे वाहतूक कोंडी व नागरिकांना त्रास होत असून प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत मुरूड-जंजिरा नगर परिषदेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून मच्छीमार्केट बांधण्यात आले आहे. तथापि, मच्छीविक्रेत्या महिलांनी मार्केटमध्ये न बसता वाहनतळ व समोरच्या रस्त्यावर राजरोस व्‍यवसाय सुरू केला आहे, त्‍यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. एकदरा, राजपुरी तसेच शहराबाहेरून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीमुळे कसरत करावी लागत आहे. त्‍यामुळे नगर परिषद व पोलिस प्रशासनामार्फत ही वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
...............
२ ऑगस्टला डाक कार्यालये बंद
रोहा (बातमीदार) ः भारत सरकारच्या आयटी २.० प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे २ ऑगस्टला रायगड जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालये बंद राहतील. ग्राहकांना गुरुवारी (ता. ३१) पूर्वी तातडीची कामे पूर्ण करण्याचे आवाहन डाक विभागाने केले आहे. भारत सरकारच्या डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याकरिता डाक विभागात आयटी २.० या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. या प्रणालीमुळे डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणारी सेवा ही अचूक, जलद व ग्राहकाभिमुख होईल. या आयटी २.० प्रणालीची अंमलबजावणी ४ ऑगस्टला रायगड जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात (प्रधान डाकघर, उपडाकघर, शाखा डाकघर) होणार आहे. याकरिता डेटा ट्रान्सफर ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. जी शनिवारी (ता. २ ऑगस्‍ट) केली जाईल. या कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील डाक कार्यालयासंबधित सर्व कामे ही शनिवारी (ता. २ ऑगस्ट) बंद राहतील.
...................
कुर्डुस जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांची देवदर्शन सहल
पोयनाड (बातमीदार) ः येथून कुर्डुस जिल्हा परिषद मतदारसंघातील २,५००हून अधिक महिलांची दोनदिवसीय देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. शिवसेना नेते राजा व रसिका केणी यांच्या पुढाकारातून जेजुरी, आळंदी, देहू, एकवीरा आदी ठिकाणी दर्शन घेण्यात आले. महिलांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. एकूण ४४ बसच्या माध्यमातून या देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. हेमनगर येथील शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या महिला देवदर्शन सहलीचा शुभारंभ राजिपचे माजी समाजकल्याण सभापती व शिवसेना नेते दिलीप भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. या सहलीच्या उत्तम नियोजनाबद्दल सहभागी महिलांनी आयोजकांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com