ठाकरेंच्या युवासेनेकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा उपयुक्त पुस्तकांची भेट
ठाकरेंच्या युवासेनेकडून स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट
कल्याण, ता. २७ (बातमीदार) : शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कल्याण पूर्वतर्फे समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. बी पब्लिकेशन यांच्या सौजन्याने कोळसेवाडीतील ज्ञानेश्वर माउली सार्वजनिक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध केली आहेत.
दरवर्षी देशभरात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये कोट्यवधी विद्यार्थी सहभागी होतात. यामध्ये विविध शासकीय परीक्षा, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा तसेच व्यवस्थापन आणि इतर क्षेत्रांतील परीक्षांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके युवासेनेने उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार व माहितीपूर्ण पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानयात्रेसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल असल्याचे या वेळी युवासेना शहर अधिकारी अॅड. नीरज कुमार म्हणाले.
याप्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष तानाजी शहाणे, शिवसेना उबाठा विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण पाटील, शहरप्रमुख शरद पाटील, उपशहर अधिकारी दत्तात्रेय पाखरे, शांताराम डिगे, शांताराम गुळवे, पंकज पांडे, उमेश परब, रमेश तिखे, हेमंत चौधरी, जगदीश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.