थोडक्यात बातम्या रायगड
फिरोज टॉकीज ते श्री धावीर महाराज मंदिर रस्त्याची दयनीय अवस्था
रोहा, ता. २८ (बातमीदार) ः फिरोज टॉकीज ते श्री धावीर महाराज मंदिर या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी व चिखल साचल्याने नागरिक व भक्तांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो लोक प्रवास करतात, मात्र प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.
या परिसरात अनेक राजकीय पुढारी व समाजसेवक असूनही रस्त्याच्या कामासाठी कोणीही पुढे येत नाही, ही बाब जनतेत नाराजीचे कारण बनली आहे. वाढदिवसाच्या जाहिरातींमधून प्रसिद्ध होणारे स्वयंघोषित समाजसेवक प्रत्यक्ष कामात मात्र कुठेही दिसत नाहीत. नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष वेधत या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
................
अलिबागमध्ये ४.१७ लाखांचा गुटखा जप्त
अलिबाग (वार्ताहर) ः अलिबाग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सव्वाचार लाख रुपये किमतीचा गुटखा आणि चरससदृश अमली पदार्थ जप्त करत दोघा आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई अलिबाग शहरातील हरीष बेकरीसमोर व वायशेत परिसरात करण्यात आली. आरोपींची नावे नकुल कुमार आणि राम केवल रामप्रसाद निशाद (रा. उत्तरप्रदेश) अशी आहेत. पोलिसांनी निशादच्या घरी छापा टाकून विविध प्रकारचे पानमसाले, तंबाखू आणि चरससदृश गोळ्या असा एकूण ५४, ५९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांकडून एकूण ४, १७, ४३९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.............
भक्तीभावातून उभारलेले मंदिर म्हणजे श्रद्धेचे प्रतीक : तटकरे
रोहा (बातमीदार) ः रोह्यातील प्रसिद्ध मारुती मंदिराचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने पार पडले. यावेळी बोलताना तटकरे म्हणाले, प्रखर इच्छाशक्ती आणि भक्तीभाव असल्यामुळेच पुरातन मंदिराचे नूतनीकरण शक्य झाले. मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपयांहून अधिक निधी मिळवण्यात आला.
या मंदिराचा सरकारशी काहीही संबंध नसून हे मंदिर पूर्णपणे रोहेकरांचेच राहणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी श्री धावीर मंदिरासाठी १० कोटी रुपयांच्या निधीतून आराखडा तयार असून दीड वर्षांत भव्य मंदिर उभे राहील असेही सांगितले. रोह्यामध्ये भविष्यात अत्याधुनिक नाट्यगृह उभे राहणार असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भक्ती आणि विकासाचा संगम साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
................
देहेन येथे गुरुपूजन सोहळा उत्साहात पार
पोयनाड (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील देहेन येथील हनुमान मंदिरात विठ्ठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने गुरुपूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी मंत्र व श्लोक पठण केले. कीर्तनकार अमित म्हात्रे यांचे प्रवचन, गुरुपूजन, सामुदायिक हरिपाठ, आरती आणि महाप्रसाद असे कार्यक्रम यानिमित्त पार पडले. परिसरातील वारकरी व बालवारकरी मंडळींची मोठी उपस्थिती होती.
...............
कनकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
पोयनाड (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे चार वाजता मंदिरात पूजा-अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. पायथ्यापासून मंदिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. बेल, श्रीफळ, हार, पूजेच्या साहित्याची जोरदार विक्री झाली. भाविकांना सुलभ दर्शनासाठी कनकेश्वर देवस्थान ट्रस्टने उत्कृष्ट नियोजन केले होते. पोयनाड परिसरातील इतर शिवमंदिरेही भाविकांनी गर्दीने भरून गेली होती.
..............
माणगाव संगमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार भक्तिभावाने साजरा
माणगाव (बातमीदार) ः जुने माणगाव येथील संगमेश्वर मंदिरात पहिला श्रावणी सोमवार मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. पहाटेपासून रात्रीपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजयआण्णा साबळे व सदस्यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत केले. संगमेश्वर मंदिर नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध असून दरवर्षी महाशिवरात्री, दीपोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची उपस्थिती असते.
.............
मुरुड पोलिसांचे अमली पदार्थविरोधी विशेष कामगिरीबद्दल सन्मान
मुरुड (बातमीदार) ः मुरूड पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे व आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा अमली पदार्थविरोधी विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २९ जून रोजी त्यांनी १३ आरोपींना अटक करत सुमारे १७ लाखांचा चरस जप्त केला होता. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक विजयकुमार देशमुख, भास्कर जाधव, अविनाश पाटील, किशोर बठारे आदींच्या सहभागाने पार पडली. रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला व पुढील उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
..............
आई डे केयरमधील विद्यार्थ्यांच्या राख्यांना प्रतिसाद
पेण (वार्ताहर) ः पेण येथील आई डे केअर संस्थेच्या गतिमंद विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनासाठी स्वतः तयार केलेल्या राख्यांना समाजाच्या विविध स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुमारे २१ हजार राख्यांची विक्री देशभरात तसेच अमेरिकेतही होत आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या डॉ. शिल्पा ठाकूर, ॲड. सतीश म्हात्रे, प्रेमलता पाटील आदींचे मोलाचे योगदान आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना सात हजार रुपयांपर्यंत मानधन मिळाले असून भविष्यात ते १० हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा संस्थेचा मानस आहे. हे उदाहरण विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनाचा प्रेरणादायक आदर्श ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.