कर्जतमध्ये सुरक्षेचे तीन तेरा!
कर्जतमध्ये सुरक्षेचे तीन तेरा!
सीसीटीव्ही, वीज दिवे व हायमॅक्सकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कर्जत, ता. २८ (बातमीदार) ः कर्जत नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक रस्त्यावरील वीज दिवे आणि शहराचा मुख्य हायमॅक्स दिवा या तीनही बाबतींत सध्या भीषण निष्काळजी दिसून येत आहे. रात्री-अपरात्री अनेक मार्गावर अंधार असल्याने परिणामी, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
नगर परिषदेकडून पूर्वी १७० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र ती केवळ कागदापुरतीच राहिली. सद्यःस्थितीत फक्त सहा कॅमेरे कार्यरत आहेत. याआधी काही वेळा आंदोलनानंतर तातडीने कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले, मात्र काही दिवसांतच ते परत बंद पडले. यामुळे ठेकेदारांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होत आहे. शिवाय प्रशासनदेखील कोणतीच कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. शहरात घडणाऱ्या चोरी, घरफोडी आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये तपासासाठी पोलिसांना सीसीटीव्ही महत्त्वाचे ठरतात, पण कॅमेरे बंद असल्याने पोलिस यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहेत. सार्वजनिक रस्त्यावरील विजेचे दिवेही बंद, तर काही ठिकाणी नवे दिवे बसवले गेले असले तरी अजून त्यांना वीजजोडणीच दिली गेलेली नाही. परिणामी, महिलांना आणि वृद्ध नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातून वाट काढावी लागते. विशेषतः शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चारफाटा परिसरातील हायमॅक्स दिवा अनेक दिवसांपासून बंद आहे.
................
आंदोलन करूनही प्रशासन ढिम्म
या स्थितीकडे कर्जत शहर बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी वेळोवेळी लक्ष वेधले आहे. त्यांनी आंदोलनाद्वारे आणि माध्यमांतून अनेकदा प्रशासकीय गलथान कारभार उघड केला आहे, मात्र प्रशासनाची हालचाल केवळ तात्पुरती असते, हीच नागरिकांची भावना बनली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी आहे. नगर परिषदेच्या प्राथमिक जबाबदाऱ्यांकडे असे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
......................
कोट
शहरातील सीसीटीव्हीबाबत लवकरच आढावा घेऊन ते कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील.
-तानाजी चव्हाण, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.