अडगळीच्या खोलीत प्रसूती
अडगळीच्या खोलीत प्रसूती
वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती
मोहिनी जाधव; सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २९ : गळके छत, ओल मारलेल्या भिंती, भिजलेल्या गाद्या, फरशीवर पाणीच पाणी या परिस्थितीत गर्भवती स्त्रियांची प्रसूती अडगळीच्या खोलीत करण्याची वेळ वांगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आली आहे. पावसाळ्यात संपूर्ण आरोग्य केंद्राला गळती लागल्याने या ठिकाणी एकही रुग्ण उपचार घेत नाहीत. तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या सगळ्या रुग्णांना इथून घरी पाठवले आहे.
बदलापूरजवळील वांगणी परिसरातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला घरघर लागली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या रुग्णालयाच्या छतावरून पावसाचे पाणी झिरपून, संपूर्ण रुग्णालयात पाणीच पाणी आहे. एकूण सहा खाटांचे हे रुग्णालय असून, गळतीमुळे सगळ्या रुग्णांना घरी पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांच्या प्रसूती कक्षात सगळ्या ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे या महिलांवर रुग्णालयाच्या अडगळीच्या खोलीत ज्या ठिकाणी शौचालय आहेत, त्या ठिकाणी या महिलांवर प्रसूती करण्याची वेळ आरोग्य केंद्रावर आली आहे. इथल्या सगळ्या खोलींमध्ये हीच स्थिती दिसत असून, रुग्णांच्या खाटांवरील चादरी पूर्णपणे ओलचिंब झालेल्या आहेत. संपूर्ण भिंती भिजल्या आहेत. छतावरून सतत पाणी झिरपत आहे. अशा परिस्थितीत हे आरोग्य केंद्र शेवटच्या घटका मोजत आहे.
ग्रामीण भागातील जवळपास १० पेक्षा जास्त गावे तसेच जवळपासच्या २० ते २५ आदिवासी पाड्यांमधील वस्तीसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. दर दिवशी ५०० हून जास्त रुग्ण या ठिकाणी तपासणीसाठी येतात; मात्र ऐन पावसाळ्यात लागलेल्या गळतीमुळे ताप सर्दी खोकल्यासाठी आलेल्या रुग्णांना औषधे देऊन घरी पाठवले जाते. अगदीच रुग्णाला दाखल करण्याची वेळ आली असेल, तर अशा रुग्णांना, बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालय किंवा उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले जाते; मात्र सगळ्यात मोठी अडचण आणि त्रास हा गर्भवती स्त्रियांना होत असून, सद्यःस्थितीला चक्क अडगळीचे सामान आणि शौचालय असलेल्या खोलीत या महिलांची प्रसूती करण्याची वेळ इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर आली आहे.
आरोग्य कर्मचारीही सुविधांपासून वंचित
साधारण एक वैद्यकीय अधिकारी व दोन डॉक्टर व इतर कर्मचारी अशी १० ते १२ अशी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या आहे; मात्र इथे डॉक्टरांना बसायला खोली नाही, तपासणी व इतर सगळ्या खोल्यांची अक्षरशः पावसात पडझड झाली आहे. याच परिस्थितीत इथे रुग्णसेवा देण्याची वेळ या आरोग्य कर्मचाऱ्यांवर आली आहे. इथे येणारे बहुतांश रुग्ण आदिवासी आणि गरीब कुटुंबातील आहे. तक्रार केल्यावर आहे ती सुविधा मिळणार नाही, या भीतीने कुणीही तक्रार करायला पुढे येत नाही.
संपूर्ण इमारतच धोकादायक
वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण इमारतच धोकादायक झाली आहे. या ठिकाणी इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत, तर भिंतींमध्ये ओल मारून बाहेरील बाजूला इमारतीच्या भिंतीवर मोठमोठ्या वनस्पती वाढल्या आहेत. त्यातच आता छतदेखील गळत असल्याने इमारत धोकादायक बनली आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक चांगल्या सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी वांगणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणी येथे परिसरातील एकूण ३० ते ३५ हजार नागरिक अवलंबून आहेत. रुग्णालयात चार खाटांची व्यवस्था आहे; मात्र या ठिकाणी पावसाळ्यात लागलेल्या गळतीमुळे सगळीकडे पाणी साचले आहे. बेड भिजले आहेत, चादरी ओल्या झाल्या आहेत, भिंतींना ओल आहे आणि अशा परिस्थितीत हे रुग्णालय सुरू आहे. एवढा मोठ्या लोकसंख्येसाठी आरोग्य व्यवस्थेकडे पूर्णतः शासनाचे दुर्लक्ष होत आहे. जर कोणते अधिकारी या ठिकाणी दुर्लक्षपणा करत असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. लवकरात लवकर या आरोग्य केंद्राची डागडुजी करून रुग्णांना चांगली सोय उपलब्ध करून द्यावी.
- जयेश केवणे, स्थानिक रहिवासी
छत गळती होत आहे, यासंदर्भात वरिष्ठांना अनेकदा पत्रव्यवहार केला आहे, सगळ्या परिस्थितीची माहितीदेखील देण्यात आली आहे; मात्र अजून वरिष्ठांकडून त्याबाबत काही उत्तर आलेले नाही.
- डॉ. नसीमा तडवी, वैद्यकीय अधिकारी, वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्र
आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आमच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. आम्हीदेखील त्यासंबंधी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळवले आहे. या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सुरू आहे; मात्र निधी मिळत नसल्यामुळे हे काम रखडलेले होते. आता याचा पाठपुरावा करून लवकरच निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र तोपर्यंत गळक्या छतावर ताडपत्री टाकण्याचे काम आज सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. अर्चना मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.