अलिबाग-वडखळ मार्गाची अवस्था दयनिय
अलिबाग-वडखळ मार्गाची अवस्था दयनीय
खड्डेमय रस्त्यातून बाप्पाला घरी आणायचे कसे? नागरिकांमध्ये संताप
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) ः अलिबाग-वडखळ मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.
मागील काही वर्षांपासून अलिबाग-वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे, मात्र रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते, तर पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असतात. तात्पुरती डागडुजी करून नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम प्रशासनाकडून केले जाते. यंदाही या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले जात आहे. येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. अलिबागमधील अनेक नागरिक हे गणरायाची मूर्ती पेणमधून आणतात, मात्र अशा खड्डेमय रस्त्यातून गणरायाला घरी आणायाचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूकही धीम्या गतीने होत आहे. अलिबाग-पेण मार्गाच्या चैपदरीकरणाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आला होता. प्रकल्पाला येणारा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून तो गुंडाळण्यात आला. रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा पार करताना वाहनचालकांना प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. मुळात हा रस्ता शासनाच्या कुठल्या विभागाकडे आहे, हेच स्थानिक प्रशासनाला माहिती नसल्याचे दिसून येत आहे. सर्वच विभाग याबाबत टोलवाटोलवी करत आहेत.
....................
चैकट :
तात्पुरती डागडुजी पावसात गेली वाहून!
अलिबागमधील पोयनाड, कार्लेखिंड, तळवली, वाडगाव, गोंधळपाडा, पिंपळभाट, बायपास रोड येथे एक ते दीड फुटांचे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी हे खड्डे सामाजिक संस्था व स्थानिक तरुणांनी एकत्र येत खडी व मातीच्या सहाय्याने बुजविले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जागे होत या खड्ड्यांमध्ये भरपावसात बारीक खडी टाकली होती, मात्र ही तात्पुरती डागडुजी त्यानंतर पडलेल्या चार दिवसांच्या मुसळधार पावसात वाहून गेली. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहात आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.