मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार उत्सुक
मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार उत्सुक
शासनाकडे अनुदान व डिझेल परताव्याची मागणी
श्रीवर्धन, ता. २९ (वार्ताहर) : गेल्या दोन महिन्यांपासून शासनाने लागू केलेली वार्षिक मासेमारीबंदी गुरुवारी (३१ जुलै) संपुष्टात येत आहे, तर शुक्रवारपासून (१ ऑगस्ट) नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील मच्छीमार व्यावसायिकांची नजर पुन्हा एकदा समुद्राकडे लागली आहे. कोळीवाड्यांमध्ये बोटींची डागडुजी, रंगरंगोटी, इंजिन तपासणी आणि मासेमारीसाठी आवश्यक जाळींची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, तालुक्यातील हजारो मच्छीमार सज्ज झाले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात सुमारे ६२३ मोठ्या व ३५८ लहान बोटी असून, सुमारे ६, ५०० मच्छीमार व्यावसायिक या व्यवसायावर अवलंबून आहेत. मासेमारी हा मुख्यतः १० महिन्यांचा व्यवसाय असून, उर्वरित दोन महिने म्हणजे जून व जुलै हे प्रजनन हंगामामुळे बंदीचे असतात. या काळात मच्छीमारांना उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बंद झाल्याने सुक्या मासळीचा व्यवसाय बोंबील, जवळा, अंबड, खारा आदींमधून काही प्रमाणात उत्पन्न मिळते. पूर्वी लाकडी बोटी असल्याने मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करावी लागे; मात्र आता अनेक मच्छीमार फायबर बोटींवर अवलंबून असल्याने डागडुजीचा खर्च तुलनेने कमी झाला आहे. तरीही इंजिन सर्व्हिसिंग, तेल बदल, जाळीखरेदी यांसाठी आर्थिक गुंतवणूक मोठी असल्याने मच्छीमार व्यावसायिक कर्जबाजारी होण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत.
.............
मच्छीमारांचा शासनाकडे सानुग्रह अनुदानासाठी आग्रह
गेल्या दोन-तीन वर्षांपासून हवामान बदल, वादळाच्या सततच्या इशाऱ्यांमुळे अनेक वेळा मासेमारी बंद ठेवावी लागते. परिणामी, उत्पन्नात मोठी घट होते. यामुळे बँकांचे कर्ज, डिझेल परतावा आणि विमा योजनेतील अडचणी मच्छीमारांवर आर्थिक भार टाकतात. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांनी शासनाकडे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.
..............
मासेमारीबंदीचे वैज्ञानिक कारण
पावसाळ्यातील मासेमारीबंदीचा उद्देश माशांच्या प्रजननास संधी देणे हा आहे. या काळात मासे संख्येने वाढतात. बंदीमुळे जैवविविधतेचे व पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. त्यामुळे दीर्घकालीन फायद्यासाठी ही बंदी अत्यावश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
...............