राडारोडामुक्तीचा ध्यास

राडारोडामुक्तीचा ध्यास

Published on

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २९ : गुजरात आणि महाराष्ट्राला जोडल्या गेलेल्या मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत प्रचंड प्रमाणात राडारोडा टाकण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात पाण्यासाठी मार्ग नसल्याने जलमय परिस्थिती, तसेच वाहनांना अडचणीचे ठरत असते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जात आहे. ट्रकमधून टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यावर नजर ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर लवकरच सीसीटीव्हीची मदतदेखील घेण्यात येणार आहे. महामार्गावर राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीचा बडगादेखील उगारला जाणार आहे.

पालघर जिल्ह्यात नागरीकरण वाढत असल्याने नवीन बांधकामे वेगाने उभारत आहेत. नवीन घरे, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, जुनी घरे तोडल्याने मोठ्या प्रमाणात रॅबिट, माती, विटा असा बांधकामाच्या ठिकाणी राडारोडा निर्माण होतो. हा कचरा टाकण्यासाठी प्रकल्प नसल्याने डम्पर, ट्रक अथवा टॅक्टरच्या माध्यमातून विकसक उचलतात व मोकळ्या जागा किंवा नाल्याच्या बाजूला रात्रीच्या वेळी फेकून देतात. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बेकायदा फेकण्यात आलेला राडारोडा मोठ्या प्रमाणात साचतो. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होतेच, परंतु सेवा रस्ता, आजूबाजूच्या परिसरावर परिणाम होतो.

पावसाळ्यात पाण्यासाठी मार्ग नसल्याने रस्ते जलमय होऊन कोंडी निर्माण होते, तर शहरातदेखील अशीच परिस्थिती निर्माण होते. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा नसल्याने विकसक रात्रीच्या वेळी हा कचरा फेकतात, तसेच महामार्गावर खच निर्माण होतो. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे. यापुढे रस्त्याशेजारी बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. यासाठी पालघर जिल्हा विभागाकडून मोहीम हाती घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने महसूल विभाग, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालघर जिल्हा विभाग, तसेच पोलिस पथकांचा समावेश असणार आहे. या यंत्रणेद्वारे राडारोडा घेऊन येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे पालघर जिल्हा हा भविष्यात राडारोडामुक्तीकडे वाटचाल करणार असून, वाहनचालकांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

प्रकल्प रखडला!
राडारोड्यामुळे शहराला विद्रुपीकरण येते आणि चालकांच्या जीवाला धोकाही असतो. त्यामुळे महापालिकेने २०२२ मध्ये प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला, मात्र अद्यापही शहरात ठिकठिकाणी राडारोडा हा मोकळ्या जागेवर, रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणी केव्हा होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सशुल्क राडारोडा विघटन केंद्र
वसई-विरार महापालिका आणि पालघर जिल्हा कार्यालयामार्फत राडारोडामुक्तीसाठी सशुल्क विघटन केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळे शहर आणि महामार्गावर राडारोडा नष्ट होण्यास मदत मिळणार आहे. याची कार्यवाही लवकरच केली जाणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ससूपाडा येथे कंटेनर उभारले आहे. या ठिकाणी राडारोडा घेऊन येणाऱ्या वाहनांवर महसूल विभाग, पोलिस, प्राधिकरण विभाग नजर ठेवणार असून, महसूल आणि पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
- सुहास चिटणीस,
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग

महामार्ग राडारोडामुक्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. विघटन केंद्र, पथक तैनात करणे, तसेच महामार्गावर सीसीटीव्ही लावण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- गणेश नाईक, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com