वृक्ष गजानन'' संकल्पनेला नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद....
‘वृक्ष गजानन’ला नागरिकांकडून विशेष पसंती
नवी मुंबईत आतापर्यंत तीनशे मूर्तींचे बुकिंग
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या चळवळीला आता अधिक बळ मिळाले असून, ‘वृक्ष गजानन’ या संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईत आतापर्यंत तीनशे वृक्ष गजानन मूर्तींची बुकिंग झाली आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. वैविध्यपूर्ण गणेशमूर्तींनी बाजार सजला असून, यंदा सणाचे वेगळेपण जपण्यासाठी मूर्तिकारांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीत वृक्ष गजानन हा प्रकार विशेष आकर्षण ठरत आहे. मूळतः पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन गावात काही वर्षांपूर्वी एका स्थानिक उपक्रमातून उगम पावलेल्या या संकल्पनेचा विस्तार हळूहळू आता थेट परदेशापर्यंत झाला आहे. शुद्ध शेती-मातीपासून मूर्ती तयार करून त्यात औषधी व फुलांच्या बिया रोवून, विसर्जनानंतर त्यातून रोप उगवण्याची ही कल्पना महाराष्ट्रात आपली मुळं रोवत आहे.
वृक्ष गजाननची मूर्ती
वृक्ष गजानन ही नवी संकल्पना सध्या बाजारात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. वृक्ष गजानन साकारताना बाप्पाची मूर्ती ही मातीपासून बनवली जात असून, त्यात केमिकलऐवजी विशिष्ट रंगाचाच वापर केला जातो. शिवाय या मूर्तीचे विसर्जन कुंडीत होत असल्याने ॲल्युमिनियमचे कण अधिक असलेल्या मातीमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. यात मूर्तीची उंचीही साधारण नऊ इंच ते १८ राहते.
परराज्यांसह विदेशातही मागणी
नवी मुंबईत चार वर्षांपासून ही संकल्पना राबवली जात आहे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यामुळे महाराष्ट्राव्यतिरिक्त दिल्ली, मंगळूर, बंगळूर या राज्यांमध्ये पाठवल्या जातात. त्याचबरोबर दुबई, यूके, कॅनडा, कुवेत कतार या देशांमध्येसुद्धा त्यांच्या मूर्ती पोहोचतात. एकूण पाच हजार २०० मूर्त्या बनविण्यात आल्या असून, त्यातील काही परराज्यात, तर काही परदेशात पाठविल्या जाणार असल्याची माहिती संदेश थोरात यांनी दिली.
मूर्तीच्या मातीची तुळशीच्या रूपाने पूजा
वृक्ष गजानन मूर्ती ऑर्डर केल्यानंतर दोन बॉक्स येतात. यातील एकामध्ये गणपतीची मूर्ती दिली जाते. सोबत सिल्व्हर कोटेड पाट असतो, तर दुसऱ्या बॉक्समध्ये कुंडी आणि कृष्णतुळशीचे ऑथेंटिक ब्रीड असलेल्या बियांची पाकिटे दिली जातात. विसर्जनानंतर गणेशमूर्तीच्या मातीची तुळशीच्या रूपाने पूजा होते आणि गणपतीचे पावित्र्य राखले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.