स्वबळासाठी कार्यकर्त्यांनीच दंड थोपटले
भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २९ : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर जिल्हा परिषदेची ही निवडणूक होत आहे. गट आणि गणांची अधिसूचना निघाली आहे. त्यानंतर आता राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ‘जोर-बैठका’ सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी भाजप, शिवसेनेने या निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांनीच दंड थोपटले आहे. महाविकास आघाडीचे अजूनही जिल्ह्यात सूत जुळलेले नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पालघर जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. ‘जोर-बैठका’ काढायला सुरुवात झाली आहे. १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेची मुदत संपली. त्यानंतर प्रशासकांच्या हाती कारभार गेला. पालघर जिल्हा परिषदेचे एकूण ५७ गट आणि आठ पंचायत समित्यांचे एकूण ११४ गण आहेत. पालघर जिल्ह्यात भाजपचा खासदार व तीन आमदार आहेत. भाजपचे जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विद्यमान पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हाध्यक्ष भरत रजपूत असे मोठे नेते भाजपकडे आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.
काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात नगण्य स्थान आहे. मागील निवडणुकीमध्ये त्यांचा एकच सदस्य निवडून आला होता. त्यानेही भाजपची वाट धरली. त्यामुळे काँग्रेस शून्यावर आली आहे. शिवसेना-भाजप वगळता जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले हे आमदार आहेत. माकपने आपले वर्चस्व असलेल्या भागात सदस्य निवडून आणण्याची तयारी केली आहे. बहुजन विकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्याचा धडा घेत त्यांनी वसई-विरार महापालिकेसह जिल्हा परिषद निवडणुकीची मोर्चेबांधणी केली आहे. जिल्ह्यात युती आणि आघाडीचे अजूनही संकेत मिळालेले नसल्याने, सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर बैठका घेत आपल्या पक्षाची, तसेच त्या-त्या पक्षातील इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी करीत निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.
खंद्या समर्थकांवरच धुरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यावर पकड आहे. शिंदे गटाचे दोन आमदार, दोन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख अशी पक्षाची बांधणी आहे. पदाधिकारी स्वतंत्र बैठका घेत स्वबळाचा नारा देत आहेत. तसेच जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे शिवसेनेत दाखल झाल्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेची जिल्ह्यातील अवस्था डळमळीत झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून हा पक्ष विस्कळित झाला आहे. नीलेश गंधे, अनुप पाटील, अजय ठाकूर, राजेंद्र दुबळा या खंद्या समर्थकांवरच पक्षाची धुरा अवलंबून आहे. त्यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.
अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे. पक्ष एकसंघ असताना जिजाऊ संघटनेच्या सहकार्याने त्यांनी १२ जागांवर विजय मिळवला होता. आता अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आनंद ठाकूर आणि शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा यांचे नेतृत्व या पक्षांकडे असले तरीही जिल्ह्यांमधे एकही आमदार नसल्याने आणि जिल्ह्यातील संघटन कमकुवत झाल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी निकराने प्रयत्न करावे लागणार आहेत.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
शिवसेना १८
भाजप १३
राष्ट्रवादी काँग्रेस १२
माकप ६
बविआ ४
अपक्ष ३
काँग्रेस १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.