शिवाजी पार्क मैदान परिसरातील स्वच्छतेवर भर

शिवाजी पार्क मैदान परिसरातील स्वच्छतेवर भर

Published on

शिवाजी पार्क मैदान परिसरातील स्वच्छतेवर भर
महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : दादरच्या शिवाजी पार्क मैदान परिसराला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी (ता. २९) भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. मैदान, पदपथ आणि परिसराच्या अनुषंगाने त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. मैदान परिसरात सुधारणा, नियमित देखभाल, दुरुस्ती तसेच स्वच्छतेच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात तसेच परिसरातील कट्ट्यांची दुरुस्ती करतानाच पुरेशा प्रकाश व्यवस्थेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश या वेळी गगराणी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. या वेळी स्थानिक आमदार महेश सावंत व पालिका अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी पार्क मैदान परिसरातील पदपथांची नियमित देखभाल, दुरुस्ती, झाडांचे कठडे व्यवस्थित करतानाच सोप्या आणि आकर्षक रंगसंगतीने ते सुशोभित करावेत. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने सुलभ आसन व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचनादेखील पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी संपूर्ण कट्टा काही वर्षांपूर्वी सुशोभित केला होता. कट्ट्यावर विविध रंगसंगती असलेल्या चौकोनी आकाराचे तुकडे (चिप्स) लावण्यात आले आहेत. ते बदलून पूर्वीसारखा कट्टा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी या वेळी केली. स्थानिकांच्या सूचनेचा विचार करत या ठिकाणी योग्य ती डागडुजी करण्याचे व नियमितपणे कट्ट्याची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

धुळीच्या अनुषंगाने उपाययोजना
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या तज्ज्ञांच्या मदतीने धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. या परिसरात हिरवळीसाठी गवत लागवडीचे काम आयआयटी तज्ज्ञांच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आणखी धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येतील, असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.

माहीम किल्ला परिसराला भेट
माहीम किल्ला परिसराला या वेळी पालिका आयुक्तांनी भेट दिली. सदर किल्ला हा पुरातन वास्तू असून, किल्ल्याचे जीर्णोद्धार व पुनरुज्जीवन करावयाच्या उपायोजना व परिसराचे सुशोभीकरण या बाबी एकत्रित विचारात घ्याव्यात. भविष्यात या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे प्रेक्षणीय स्थळ म्हणून कशाप्रकारे विकसित करता येईल, याचा विचार करा, असेही गगराणी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com