कल्याण अवती-भवती
डोंबिवली फेरीवालाप्रश्नी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
कल्याण (वार्ताहर) : रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरप्रमुख अभिजित सावंत यांचे डोंबिवली स्थानक परिसरात गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यानिमित्ताने माजी महापौर आरती मोकल, माजी महापौर अनिता दळवी, संपर्क संघटक मृणाल यदनेश्र्वर, जिल्हा संघटक वैशाली राणे-दरेकर आणि शहर संघटक अक्षरा पटेल यांनी मंगळवारी (ता. २९) कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी भेट घेऊन चर्चा केली. डोंबिवली रेल्वेस्थानक १५० मीटर फेरीवालामुक्त झाला पाहिजे. डोंबिवली रेल्वेस्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. रेल्वेस्थानकापर्यंत जायचे असेल तरी वाहने स्थानकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. राजकीय वरदहस्त, शासकीय अनास्था यामुळे सुसंस्कृत डोंबिवली अशी ख्याती असणाऱ्या डोंबिवलीची बजबजपुरी झाली आहे. यातील काही फेरीवाल्यांची दादागिरी वाढली आहे. ते नागरिक, नगरसेवक, शासकीय अधिकारी यांना मारहाण करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. डोंबिवलीची स्मार्टसिटी करायची असेल तर डोंबिवली रेल्वेस्थानक फेरीवालामुक्त झालाच पाहिजे, यासाठी अभिजित सावंत यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा बुधवारी दहावा दिवस असून या वेळी पिंडदान आंदोलन करण्यात आले, असे आवाहन शहरप्रमुख अभिजित सावंत यांनी केले आहे.
...........................
मुलाला शिक्षकाची मारहाण
डोंबिवली : शहरातील एमआयडीसी परिसरातील एका शाळेतील वर्गात एक विद्यार्थी आपल्या मित्राबरोबर मस्ती करीत होता. या वेळी एका बारा वर्षाच्या मुलाने चुकून शिवी दिली. ही शिवी वर्गातील शिक्षकाने ऐकली. त्या शिक्षकाने संबंधित मुलाला मारहाण केली. हा सगळा प्रकार मुलाच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर मुलाच्या आईने मानपाडा पोलिस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
........................
स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये दीप अमावस्या
डोंबिवली (बातमीदार) : दीप अमावस्या हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आहे. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेतही अत्यंत उत्साहात दीप अमावस्या साजरी केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध आकार व प्रकारांचे दिवे आणले होते. शाळेतील शिक्षिका नीता पवार, वर्षा पाटील तसेच पालकांच्या मदतीने श्रावण महिन्यातील विविध सणांचे प्रतीकात्मक चित्र दर्शवणारी रांगोळी विविध रंग, फुले व दिव्यांचा वापर करून काढण्यात आली होती. मुख्याध्यापिका मुणगेकर यांनी दीप प्रज्वलित करून दीप पूजन केले. सर्व विद्यार्थ्यांनी दीपआरती गाऊन दीप पूजनात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना कथेच्या माध्यमातून दीप पूजनाचे महत्त्व सांगण्यात आले. अशाप्रकारे उत्साहात दीप अमावस्या साजरी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.