मुरुड तालुक्यात भात १०० टक्के
मुरूड तालुक्यात भातलावणी पूर्ण
समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह
मुरूड, ता. ३० (बातमीदार) : यावर्षी मुरूड तालुक्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील भातलावणीचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीपासूनच दमदार पावसाची सुरुवात झाली होती. यावर्षी मे महिन्यात तब्बल ८७८ मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी, भातशेतीसाठी अनुकूल हवामान मिळाल्याने शेतकऱ्यांनी जोरदार तयारी करत पेरणीला सुरुवात केली.
मुरूड तालुक्यात सुमारे ३, ३०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. या भागात ‘सुवर्णा’, ‘जया’, ‘रूपाली’, ‘वाडा कोलम’, ‘रत्ना’, ‘शुभांगी’, ‘कर्जत’ आणि ‘पनवेल’ या जाती प्रामुख्याने लावल्या जातात. यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे धूळपेरणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘रोहू पद्धती’ वापरून भात रोपवाटिका तयार केल्या. पाण्यात भिजवून बियाणे मोड आणून चिखलणीनंतर पेरणी करण्याची ही पद्धत कोकणातील अनेक शेतकऱ्यांनी यशस्वीपणे अवलंबली.
...................
मजुरी दर आणि टंचाई
यावर्षीही नेहमीप्रमाणे मजुरांची टंचाई जाणवली. नांगरणीसाठी प्रति दिवस एक हजार रुपये, पुरुष मजुरांना ६०० रुपये, तर महिलांना ३००-४०० रुपये दरम्यान मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. काही ठिकाणी मनरेगाच्या कामांमुळे मजुरांची उपलब्धता अत्यंत कमी होती, असेही बोलले जात आहे.
.................
नवीन पद्धतींचा प्रयोग
कृषी विभागामार्फत ‘सगुणा राईस टेक्निक’ (एसआरटी) व ‘चारसूत्री भातलागवड’ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आली. यांत्रिकीकरणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असला तरी काही भागात प्रयोगशील शेतकरी यंत्र वापरून शेती करत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मात्र ही यंत्रणा अजून खर्चिक व अकार्यक्षम ठरत आहे.
...............
पीक विम्यावरील उडाला विश्वास
पीक विमा योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदवले आहे. भातपिकाची आणेवारी ५१ टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच विम्याची भरपाई मिळते, मात्र कोकणात सरासरी उत्पादन ६०-७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे बहुतांश शेतकरी विम्यापासून वंचित राहतात. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असमाधान आहे.
.............
कृषी विभागाची मार्गदर्शक भूमिका :
तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, माती परीक्षण, हिरवळीचे खते, भात रोपवाटिका व्यवस्थापन यासारख्या विविध बाबींवर प्रशिक्षण दिले गेले. तसेच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.