शहापूर ते मुरबाड रस्त्याची रखडपट्टी

शहापूर ते मुरबाड रस्त्याची रखडपट्टी

Published on

शहापूर ते मुरबाड रस्त्याची रखडपट्टी
महामार्गासाठी नेमणार नवा ठेकेदार
शहापूर, ता. ३० (वार्ताहर) : शहापूर ते मुरबाड आणि पुढे खोपोलीपर्यंत महामार्गावरील अर्धवट स्थितीत राहिलेल्या टप्प्यांसाठी नव्याने एजन्सी नेमणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाने जाहीर केले आहे. रस्ते विकास महामंडळाने तब्बल आठ वर्षे या महामार्गावरील रखडलेल्या ठिकठिकाणचे टप्पे पूर्ण करण्याबाबत हलगर्जी केली आहे. या हलगर्जीचा फटका महामार्गालगतच्या गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शिवाय लोकप्रतिनिधींनीदेखील याविरोधात आवाज उठवला नाही. त्यांनी आठ वर्षे मौन राखले; मात्र आता नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असल्याने सध्या माजी मंत्री कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि आमदार किसन कथोरे रखडलेल्या महामार्ग प्रश्नाच्या मैदानात उतरले आहेत; मात्र २०१४ पासून सत्तेत असलेल्या पाटील, बरोरा आणि कथोरे यांनी या प्रश्नाबाबत आवाज उठवला असता, तर आज ही वेळ आली नसती अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक उपस्थित करीत आहेत.

शहापूर-खोपोली महामार्ग मंजूर झाल्यानंतर त्याचे बांधकाम आठ वर्षांपूर्वी सुरू करूनही या रस्त्याचे संपूर्णतः काँक्रीटीकरण अद्यापही झालेले नाही. ठिकठिकाणच्या टप्प्यांमध्ये रस्ता अपूर्ण राहिल्याने तेथील रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. शहापूर तालुक्यात काही ठिकाणी वनजमीन आणि खासगी भूसंपादनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महामार्गाच्या टप्प्यांचे काँक्रीटीकरण शिल्लक राहिले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावकऱ्यांना येथून प्रवास करणे जिकरीचे बनले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्याची अवस्था आणखी बिकट बनत असल्याने गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि आजारी रुग्णांना हाल सोसावे लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून रस्त्याच्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे; मात्र रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना केलेली नाही. शहापूर-खोपोली महामार्गाचा प्रश्न ज्वलंत असल्याने अमंगळवारी (ता. २९) माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेत शहापुरातील या रस्ते प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली. तसेच आमदार किसन कथोरे यांनीदेखील सोमवारी (ता. २८) शहापूरला भेट देऊन एमएसआरडीसीच्या अभियंत्यांसोबत चर्चा करून रस्त्याची समस्या सोडविण्याची मागणी केली.

तात्पुरत्या उपाययोजना
आमदार कथोरे शहापूरला भेट देणार असल्याने सोमवारी शहापूर ते सापगाव या अंतरादरम्यान खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले होते, परंतु खड्डे बुजविण्याची प्रक्रिया अनेकदा या रस्त्यावर करण्यात येऊनही त्यानंतर परिस्थिती जैसे थे राहात आहे. यावर कायमस्वरूपी रस्ता बनविण्याशिवाय उपाय नसल्याने या महामार्गातील अपूर्ण टप्पे तत्काळ पूर्ण करावेत, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

शहापूर-खोपोली महामार्गाचे रखडलेले काम यापुढे एमएसआरडीसी पूर्ण करणार आहे. यासाठी नव्याने एजन्सी नेमण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर नादुरुस्त रस्त्याच्या डांबरीकारणाचे काम मे. नवयुगा कंपनी करणार आहे. कोळकेवाडी ते गोठेघर या अंतरातील भूसंपादन व नवीन रस्त्यासाठी डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, रस्ते विकास महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com