शहापूरसाठी ‘भावली’ ठरतेय ‘मृगजल’
शहापूरसाठी ‘भावली’ ठरतेय ‘मृगजल’
जलसंपत्ती प्राधिकरणाचा हिरवा कंदील; मात्र जॅकवेलमुळे नवीन पेच
सकाळ वृत्तसेवा
ठाणे/शहापूर, ता. ३० ः शहापूरच्या ९७ गावे आणि २५९ पाड्यांना भावली धरणातून पाणीपुरवठा करण्याचा सर्वात मोठा अडसर दूर झाला आहे. गेल्या सात वर्षांपासून ही योजना न्यायालयीन प्रक्रियेत अडकून होती; पण आता याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने निर्णय घेत शहापूरला भावलीचे पाणी देण्यास हिरवा कंदील दिला आहे; मात्र सुुरुवातीला गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा करण्याची योजना असताना आता जलसंपदा विभागाने जॅकवेलने पाणी उचलण्याचे सूचित केल्याने नवीन पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शहापूरच्या दृष्टिपथात असलेले भावलीचे पाणी आणखी काही काळ लांब पळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धरणांचा तालुका अशी शहापूरची ओळख असली तरी दरवर्षी उन्हाळ्यात हा तालुका पाणीटंचाईने होरपळून निघतो. ही टंचाई कायमची दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या भावली धरण ५०० मीटरहून अधिक उंचीवर असल्याने गुरुत्वाकर्षणाने शहापूरला पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचा ‘उगम’ झाला. शहापूर तालुक्यातील ९७ गावे आणि २५९ पाड्यांना पाणीपुरवठ्यासाठी १२.६९ दशलक्ष घनमीटर इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाला आरक्षित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१८ला झाला होता. यासंदर्भात निविदा प्रस्ताव प्रसिद्ध होऊन कामही पूर्ण झालेले आहे; मात्र भावली धरणातून पाणीपुरवठा करण्यास अनंत अडचणी येत असल्यामुळे गेल्या सात वर्षांपासून ही योजना रखडली होती.
शहापूरला पाणी हवे असेल तर मोडक सागर, मध्य वैतरणा व भातसा या धरणांतून पाणी मिळू शकते. ३,००० घनमीटरपेक्षा कमी पाऊस पडत असेल तर तो भाग दुष्काळी म्हणून गणला जातो. वैजापूर, गंगापूर हे दुष्काळी तालुके आहेत, यासाठी या चार धरणांची निर्मिती केली आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे पाणी ठाणे जिल्ह्याला देऊ नका, असा ठाम विरोध इगतपुरीवासीयांचा आहे; मात्र हा विरोध डावलत महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने ठाणे- शहापूरच्या बाजूने निर्णय दिला आहे; मात्र आता या योजनेत जॅकवेलचा नवीन अडसर निर्माण झाला आहे. सुरुवातीला ही योजना गुरुत्वाकर्षण पद्धतीने चालवण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; पण आता जॅकवेलने पंपिंग करून त्याद्वारे पाणी उचलण्यात यावे, असे जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.
अडथळ्यांची शर्यत कायम
जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्याकडून या संदर्भातील काम उभारले जाणार आहे. गुरुत्वाकर्षण पद्धतीने ही योजना राबवण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी आऊटलेट जोडणी आवश्यक आहे. या जोडणीमुळे धरणातून होणाऱ्या सिंचन आणि वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा प्रस्ताव दोन वर्षांपासून शासनदरबारी असल्याचे समजते. तर दुसरीकडे इगतपुरीच्या मानवेढे, नांदगाव सदो, फांगुळ गव्हाण आणि बोर्ली या चार गावांमधील ग्रामस्थांनी आऊटलेट ते जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सात किमी वाहिनीला विरोध केला आहे. यासह आणखी अनेक अडथळे या योजनेच्या मार्गात आहेत.
टँकरमुक्तीची प्रतीक्षा वाढणार
भावली योजनेचे ७० टक्के काम आतापर्यंत झाले आहे. तर जलवाहिन्या टाकण्याचे काम ६० टक्के शिल्लक आहे. त्यामुळे यामधील अनेक बाबींची पूर्तता करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. ही संपूर्ण यंत्रणा उभारल्यानंतर प्राधिकरणाकडून नाशिक जलसंपदा विभागाला कळविले जाईल. त्यानंतर पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे शहापूरला टँकरमुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कायदेशीर लढाईची टांगती तलवार
कमी पावसाच्या परिभागातून जास्त पावसाच्या ठिकाणी पाणी देऊ नये, असे शासनाचे धोरण आहे. या निकालावरून असे लक्षात येते, की सरकारविरुद्ध शासनच निर्णय घेत आहे. यासंदर्भात पुढील कायदेशीर लढ्याचा विचार सुरू असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा माजी तांत्रिक सदस्य, वैधानिक विकास मंडळचे डॉ. शंकरराव नागरे यांनी दिली.
गुरुत्वाकर्षणाने पाणी द्या
जॅकवेल पद्धतीमुळे पाणी उचलण्यासाठी दरमहा लाखो रुपयाच्या वीजबिलाचा खर्च सोसावा लागणार आहे. हा खर्च दीर्घकालीन परवडणारा नसून त्यामुळे ही योजना बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी प्रस्तावित असलेल्या गुरुत्वाकर्षण पद्धतीने पीसद्वारे पाइपजोडणीस परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंगळवारी (ता. २९) भेट घेऊन केली आहे. यासंदर्भातचे निवेदनही त्यांनी दिले आहे.
भावली योजनेचे काम ७० टक्क्यांहून अधिक प्रगतिपथावर आहे. गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी लिफ्ट करण्याचे योजनेचे स्वरूप होते; मात्र जलसंपदा विभागाकडून जॅकवेलने पाणी लिफ्ट करण्याच्या नव्याने सूचना देण्यात आल्या आहेत. यावर आणखी मार्गदर्शक सूचना येतील, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
- केतन चौधरी, उपअभियंता, जीवन प्राधिकरण, शहापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.