राजकीय वर्चस्वाची चढाओढ

राजकीय वर्चस्वाची चढाओढ

Published on

राजकीय वर्चस्वाची चढाओढ
तटकरेंविरोधात शिवसेना आमदारांमध्ये असंतोष, महायुतीत अंतर्गत खदखद
सुनील पाटकर ः सकाळ वृत्तसेवा
महाड, ता. २४ : राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या रायगडमधील आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील कुरघोड्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला हा वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कळीचा मुद्दा होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तसेच नगरपालिका निवडणुकांसाठीच्या हालचाली सुरू असताना प्रत्येक पक्ष स्वतंत्र मोर्चेबांधणीमध्ये उतरला आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या आमदारांचा आहे. महाडमध्ये मंत्री गोगावले, कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे, तर अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत अंतर्गत वाद धुसफूसत आहे. रायगडच्या राजकारणावर याचे गडदपणे पडसाद दिसत आहेत. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण राज्यात तसेच रायगड जिल्ह्यात रखडल्याने जिल्ह्यातही विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्यामध्ये अनेक प्रमुख पक्षांची शकले झाली आहेत. शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, शरद पवार गट, याचबरोबर भारतीय जनता पक्ष कार्यरत आहे. कधीकाळी जिल्ह्यावर वर्चस्व असलेले शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहेत. त्यात प्रमुख नेते पक्षाबाहेर पडल्याने शेकापही कमकुवत झाला आहे. जिल्ह्यामध्ये एका बाजूला ही स्थिती असताना राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये मात्र उघडपणे मतभेद दिसत आहेत.
----------------------------
जागा सोडण्यास नकार
शिवसेनेचे आमदार असलेल्या तालुक्यांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या ठिकाणच्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या जागा युती धर्मानुसार एकमेकांना सोडण्यास हे सर्व पक्ष तयार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार नाही, तर युती असेल, असा इशारा शिवसेनेच्या आमदारांनी दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीचे भवितव्य संकटात आहे.
-------------------------------
इच्छुकांची संख्या वाढली
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये तसेच नगरपालिकांमध्ये यश मिळवणारे पक्ष वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे महायुती, महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची चिन्हे रायगड जिल्ह्यामध्ये धूसर आहेत. त्यातच पक्ष, गटांची संख्या वाढल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे.
- एक तिकीट नाकारल्यास दुसरीकडून उमेदवारी लढण्याचा पर्याय इच्छुकांकडे असल्याने मतभेदाची दरी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. बदललेली राजकीय समीकरणे, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये फूट पडून निर्माण झालेले नवीन गट, ट्रिपल इंजिन सरकार अशा राजकीय वातावरणामध्ये यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगतदार होणार आहेत.
-----
रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांना देण्याची मागणी आमच्याकडून सातत्याने केली जात आहे. पालकमंत्रिपदाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादीला विरोध कायम राहील. हा तिढा महिनाभरात सुटला नाही, तर जागावाटपात शिवसेनेची भूमिका तटस्थ असणार आहे. कारण जिल्ह्यात आमचे तीन आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे.
- महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग-मुरूड विधानसभा
-----
विधानसभा निवडणुकीत पूर्ण क्षमतेने शिवसेनेच्या विरोधात लढलो आहे. प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षा असते, त्यानुसार तो प्रयत्न करीत असताना पक्षाने मला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पक्षालाही माझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मला प्रयत्न करताना आगामी निवडणुकांमध्ये तसा निकाल द्यावा लागेल.
- सुधाकर घारे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com