लोकलच्या दिव्यांग डब्यात सुदृढ प्रवाशांची घुसखोरी

लोकलच्या दिव्यांग डब्यात सुदृढ प्रवाशांची घुसखोरी

Published on

दिव्यांग डब्यात सुदृढ प्रवाशांची घुसखोरी
अपंगांना चढताना अडथळा; समाजमाध्यमांमध्ये व्हिडिओ व्हायरल
कल्याण, ता. ३१ (बातमीदार) : मध्य रेल्वेवर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून सदृढ पुरुष व महिलाही प्रवास करीत असल्याची बाब उघड झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईकडे निघालेल्या लोकलमधील व्हिडिओ एका अज्ञात दिव्यांग व्यक्तीने काढला असून, तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यात सुदृढ प्रवासी दिव्यांगांच्या डब्यातून गैरपद्धतीने प्रवास करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कल्याण जंक्शनहून मुंबई, खोपोली व कसारा मार्गावर लोकल ट्रेन धावतात. प्रत्येक लोकल ट्रेनच्या डब्यांची प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, महिला, सामान, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक अशी वर्गवारी केलेली असते. ज्या डब्यातून प्रवास करायचा आहे, त्यासाठी नियम व पात्रता असाव्या लागतात; मात्र गर्दीच्या वेळी सर्व नियमांची पायमल्ली करीत कोणीही कोणत्याही डब्यातून प्रवास करीत असल्याचे वारंवार समोर येत आहे.

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या डब्यात विशेष आसनव्यवस्था व व्हीलचेअरसाठी विशेष जागा उपलब्ध असते. या डब्यातून शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा संवेदनाक्षम कमजोरी असलेल्या व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकच प्रवास करू शकतात. यासाठी त्यांच्याजवळ दिव्यांग असल्याचे ओळखपत्रही असणे बंधनकारक आहे. याखेरीज गर्भवती महिलांनाही या डब्यातून प्रवास करण्यासाठी मुभा दिली जाते. याव्यतिरिक्त इतर व्यक्ती प्रवास करताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. व्हायरल व्हिडिओमधील व्यक्तीने एका तरुणाला ओळखपत्र विचारले असता, या तरुणाने हाताला फ्रॅक्चर असल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र इतर व्यक्ती या सुदृढ असून त्यांच्यामुळे इतर दिव्यांगांना डब्यात प्रवेश करता येत नसल्याचे या वेळी या व्यक्तीकडून सांगण्यात आले.

नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला. मी एका पायाने अपंग असल्याने डब्यात शिरण्यासाठी आधी मला थोडा वेळ लागत होता, मात्र फारशी अडचण जाणवत नव्हती. परंतु आता वयोमानाने मी रेल्वेचा प्रवास करणे थांबविले आहे. शिवाय पहिल्यापेक्षा गर्दीही खूप वाढली आहे. जर अशा पद्धतीने आमच्यासाठी राखीव असलेल्या डब्यातून हट्टेकट्टे लोक गर्दी करीत असतील तर आमच्यासारख्यांनी आत चढायचे तरी कसे?
- भाऊसाहेब गोसावी, दिव्यांग, कल्याण

Marathi News Esakal
www.esakal.com