शहरात आता कमानींचे अतिक्रमण
शहरात आता कमानींचे अतिक्रमण
सणासुदीच्या नावाखाली शहराचे विद्रूपीकरण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : शहरातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आता डोंबिवलीकरांना जागोजागी उभ्या राहणाऱ्या कमानींचा त्रास सहन करावा लागणार आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी गणेशोत्सव व इतर सणांच्या निमित्ताने मंडळांना मोफत कमानी उभारण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकून सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. या कमानींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोच, शिवाय कमान पडून अपघात घडतात याला जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल असते. त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडळाकडे राजकीय नेते झुकलेले दिसतात. कमानी, बॅनर आणि फ्लेक्सच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू होतो. प्रभागातील आपले वर्चस्व दाखविण्यासाठी इच्छुक उमेदवार तसेच पक्षांचे मोठे लोकप्रतिनिधी हे मंडळांना भरमसाठ जाहिराती, देणगी देऊन खूश करतील. आपली हक्काची मतदार बॅंक तयार करण्यासाठी प्रयत्न करतील. मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही संधी राजकीय पक्षांकडून सोडली जात नाही. मंडळांना जाहिरात देताना कोणत्या पक्षाने कितीची जाहिरात दिली. त्यानंतर कोणापेक्षा आपला बॅनर, कमानी मोठी आहे याकडे प्रतिनिधींचे जातीने लक्ष असते. कमानींमध्येदेखील कोणत्या रस्त्यावर, कोणत्या भागात पहिली, दुसरी, तिसऱ्या स्थानावर कोणाची हे देणगीवरून ठरवले जाते.
धार्मिक, सांस्कृतिक सण-उत्सवांच्या निमित्ताने लागलेल्या कमानींनी रस्तेच्या रस्ते व्यापले जातात. एकीकडे स्वच्छ सुंदर शहराकडे प्रशासन भर देताना शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या या कमानींना कधीच आवर घातला जात नाही. गणेशोत्सव काळात उभे राहिलेले कमानींचे ढाचे हे दिवाळीनंतरच काढले जातात. या कमानींमुळे शहर विद्रूपीकरणात भर पडतेच, तसेच वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्या अडथळा निर्माण करतात. या कमानी पडून वाहनांचे नुकसान, गणपती मिरवणुकीत अडथळे, अपघातदेखील झाल्याचे याआधी पाहायला मिळाले आहे. यामुळे कमानी शहरात लागू नयेत, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम राजकीय लोकप्रतिनिधींकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी गुरुवारी (ता. ३१) पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. या आढावा बैठकीत रस्त्यावरील खड्डे, पाण्याचा प्रश्न, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, गणपती मंडळांच्या समस्या इत्यादी अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. त्या सर्व प्रश्नांना आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले. आमदार मोरे म्हणाले, की सण-उत्सवांचे दिवस आले आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सण आले आहेत. पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना सणासुदीच्या काळात कोणताही त्रास होता कामा नये. यामुळे हे खड्डे बुजविले जावे, अशी मागणी आम्ही केली. त्याची ताबडतोब अंमलबजावणी आयुक्तांनी करीत खड्डे बुजविल्याने त्यांचे आभार मानले.
समाजमाध्यमांत चर्चा
मंडळांनी रस्त्यावर मंडपासाठी खड्डे खणल्यास त्यांना दंड आकारण्यात आला आहे. याविषयी आमदार मोरे म्हणाले, की मंडळांना कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये. मंडपाच्या उभारणीसाठी चार्ज घेतला जात नाही; मात्र कमानींसाठी चार्ज घेतला जातो. तो चार्ज त्यांनी घेऊ नये, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यावरही चर्चा झाली असून, आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. आमदार मोरे यांच्या वक्तव्यावरून समाजमाध्यमांत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शहर विद्रूपीकरण, वाहनकोंडीला अडथळा निर्माण करणाऱ्या कमानींना लोकप्रतिनिधीच बढावा देत आहेत. पालिका प्रशासनदेखील त्यांना हातभार लावत असून, शहरातील समस्या कधी सुटणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.