हक्काच्या घरांसाठी हल्लाबोल
हक्काच्या घरांसाठी हल्लाबोल
सिडको, नवी मुंबई पालिका मुख्यालयावर मोर्चा
नेरूळ, ता. ३१ (बातमीदार)ः नवी मुंबईतील माथाडी कामगार, अल्प उत्पन्न गटातील, एलआयजी रहिवाशांनी गरजेपोटी विस्तारलेल्या घरांवर कारवाई सुरू आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने सिडको तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर गुरुवारी (ता. ३१) मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांनी पालिका, सिडकोविरोधात रोष व्यक्त केला.
नवी मुंबई विभागात स्थानिक प्रकल्पग्रस्तांची २९ गावे आहेत. त्याचबरोबर माथाडी, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची घरे आहेत. या घरांच्या माध्यमातून नागरिकांना नवी मुंबई महापालिका व सिडको आस्थापनाच्या वाढीव बांधकाम केल्याच्या तोडक कारवाईची नोटीस बजावण्यात आली. या अनुषंगाने नवी मुंबई गावठाण व शहरी विभाग तसेच झोपडपट्टी विभागात विविध समस्या असताना आस्थापनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धडक मोर्चा काढण्यात आला. पाम बीच रोडवरील गंगाराम शेठ तांडेल चौक सेक्टर-५० येथून सकाळी १०.३० वाजता या मोर्चाची सुरुवात झाली. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
--------------------------------
अनेकांचे संसार उघड्यावर
सिडकोने कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, सानपाडा, नेरूळ या भागात ४० वर्षांपूर्वी माथाडी कामगार व गरीब कुटुंबांसाठी घरे दिली होती, परंतु आजच्या घडीला कुटुंबांचा विस्तार झाल्याने रहिवाशांनी गरजेनुसार अतिरिक्त मजले बांधले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ही बांधकामे पाडण्याची तयारी सुरू केली असून, नोटीस बजावण्यात येत आहे, पण ही घरे कर्ज काढून खरेदी केली आहेत तसेच वाढीव बांधकामासाठीही कर्ज घेतलेले आहे. त्यामुळे घरे तोडण्याचा निर्णय अन्यायकारक असून, अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची भीती आहे.
--------------------------------------
आंदोलकांचा आक्रोश
या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. निषेधाचे फलक घेऊन घोषणा देत मोर्चा पुढे-पुढे सरकत होता. घरे वाचवा, घरे वाचवा ... घरे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, सिडको प्रशासनाचा निषेध असो निषेध असो, महापालिका सिडकोचे करायचे काय? खाली डोकं वर पाय, कोण म्हणते देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय, कमी करा कमी करा सिडको घराच्या किमती कमी करा, अशा घोषणा देत जनआक्रोश करण्यात आला.
--------------------------------------
दोन महिन्यांपूर्वी पालिकेमार्फत अतिरिक्त मजले बांधल्यामुळे नोटीस देण्यात आली. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात आहे, परंतु या आंदोलनामुळे आधार मिळाला आहे.
- मृणाल हुले, महिला नेरूळ (एलआयजी)
----------------------------------------
घर बचाओ समितीचे काम करत आहोत. कामासाठी सर्व रहिवाशांनी साथ दिलेली आहे. गरीब व अल्प उत्पन्न गटातील ही घरे आहेत. गरजेपोटी बांधण्यात आलेली ही घरे आहेत. ही घरे अनधिकृत बांधलेली नाहीत. गरजेपोटी बांधलेली घरे नियमित व्हावी, अशीच मागणी आहे.
- नवनाथ चव्हाण, संस्थापक अध्यक्ष, नवयुग पंचपरमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट
-----------------------------------
सिडकोने काढलेल्या सोडतीत घरांच्या किमती अवास्तव आहेत. त्या किमती कमी कराव्यात तसेच संपूर्ण नवी मुंबईत पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशा विविध मागण्यांकरिता सिडको, महापालिकेवर हा धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे.
- सलुजा सुतार, महिला जिल्हाध्यक्ष
़़ः------------------------------------------
नवी मुंबई महापालिकेने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत बांधकामे बेकायदा ठरवून नोटिसा बजावत आहे, मात्र नागरिकांच्या दैनंदिन जगण्याचा विचार केला, तर ही कारवाई अन्यायकारक आहे. आमच्या जमिनी घेतल्या त्या वेळी कुटुंबे लहान होती, पण आता बांधलेली घरे वाढलेल्या कुटुंबांचा विचार करून बांधलेली आहेत. ती कायमस्वरूपी करण्यात यावी.
- चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.