मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ‘ठाणे’ अव्वल
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ‘ठाणे’ अव्वल
एक हजार ३३८ रुग्णांना १२ कोटींची मदत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांना चांगल्या रुग्णालयात दर्जेदार व उत्तम उपचार मिळावे, कोणत्याही रुग्णाचे उपचाराअभावी हाल होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा आधारवड बनत आहे. या कक्षाकडून मागील सात महिन्यांत कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील एक हजार ३३८ रुग्णांच्या उपचारासाठी सर्वाधिक १२ कोटींची मदत करण्यात आली आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
दरम्यान, कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे सात जिल्हे मोडतात. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून दोन हजार ७३८ रुग्णांसाठी २५ कोटी ८६ लाखांची मदत केली आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार ३३८ रुग्णांच्या उपचारासाठी १२ कोटी १० लाख १० हजारांची मदत केली असल्याची माहिती कक्षाकडून दिली. तसेच या मदतीसाठी सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ई-मेलवर पाठवावीत. अधिक माहितीकरिता टोल फ्री क्र. १८०० १२३ २२११ या क्रमांकावर कॉलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
‘या’ आजारांसाठी सहाय्य
मागील सात महिन्यांत कॉक्लियर इम्प्लांट वय वर्षे दोन ते सहा, हृदय, यकृत, किडनी, फुप्फुस, बोनमॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हीप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे :
• आधार कार्ड
• रेशन कार्ड
• रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टॅग फोटो जोडणे बंधनकारक आहे.
• तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजारांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
• संबंधित आजाराचे वैद्यकीय रिपोर्ट जोडणे आवश्यक
• वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
• रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
• अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट आवश्यक आहे.
• अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी नोंदणी पावती आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.