थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई
Published on

अण्णा भाऊ साठे, लो. टिळक यांना अभिवादन
नेरूळ (बातमीदार) ः भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. ६५, ७७ आणि ७८ यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट रोजी वाशी गाव येथे माजी नगरसेविका जनसंपर्क कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०५व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. या वेळी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत आणि समाजसेवक संदीप भगत उपस्थित होते. कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले. दशरथ भगत यांनी भाषणात टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजहितासाठी त्याग, संघर्ष व निस्पृह वृत्तीची शिकवण त्यांनी दिली, यावर त्यांनी भर दिला.
..................
महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा
नेरूळ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेतील आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगत त्यांना नागरिक म्हणून पुढेही शहराच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात लेखा अधिकारी मारुती शिंदे, उपअभियंता अविनाश जाधव, सहाय्यक लेखाधिकारी रविकांत खरात, प्राथमिक शिक्षिका अलका पवार, लघुलेखक राजेंद्र देशमुख, माहिती नोंदणीकार माधुरी नागरे, व्रणोपचारक संजय चव्हाण आणि स्वेच्छानिवृत्त सिस्टर इनचार्ज सरोज साळसकर यांचा सत्कार करण्यात आला. उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अभियंता अरविंद शिंदे, विधी अधिकारी अभय जाधव आदी अधिकाऱ्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांसोबतचे अनुभव सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या उभारणीत आणि सेवांमध्ये या कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरल्याचे सर्व मान्यवरांनी मान्य केले.
................
विद्या भवन शिक्षण संकुलाला स्वच्छता स्पर्धेचे पारितोषिक
नेरूळ (बातमीदार) ः पुणे विद्यार्थीगृहाच्या नेरूळ येथील विद्या भवन शिक्षण संकुलाने नवी मुंबई महापालिकेच्या ‘स्वच्छ शाळा स्पर्धेत’ विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले. महापालिकेच्या ज्ञानकेंद्र मुख्यालयात पारितोषिक प्रदान समारंभात संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ, शिक्षक व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ११ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत शाळा परिसर स्वच्छता, शौचालय स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम, कचऱ्यापासून खतनिर्मिती यांसारख्या विविध निकषांवर विद्या भवनने ठसा उमटवला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विविध श्रेणींमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये शाळा-महाविद्यालय, मार्केट, रुग्णालय, शासकीय कार्यालये आदी समाविष्ट होते. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांच्या सहभागामुळे हा सन्मान मिळाल्याचे संस्थेने नमूद केले.
..............
केबीपी कॉलेजचा स्वच्छता स्पर्धेत दुहेरी विजय
नवी मुंबई (बातमीदार) ः रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी (मॉडर्न कॉलेज) यांनी नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत विभागीय व महापालिका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम, प्रयोगशाळा आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था या निकषांवर कॉलेजने उत्कृष्ट कामगिरी केली. या यशाचा गौरव करताना महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. डॉ. सुनील जगधनी, प्रा. अर्जुन पोतिंदे, प्रा. कृष्णा घाडगे, प्रा. वरकड आणि सखाराम पोटे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी विद्यार्थ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
..............
विजय जगताप यांची एलआयसीमधून गौरवपूर्वक सेवानिवृत्ती
वाशी (बातमीदार) ः एलआयसीच्या वाशी शाखेतील विकास अधिकारी विजय जगताप यांनी ३५ वर्षांहून अधिक सेवेनंतर ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्ती घेतली. सेवाकाळात त्यांनी ३८० विमा प्रतिनिधी नेमून ३५,४८० विमा पॉलिसी विक्रीतून ग्राहक व संस्थेमध्ये विश्वास निर्माण केला. व्यावसायिक यशासोबतच त्यांनी अनुसूचित जाती-जमाती कल्याणकारी असोसिएशन, रमाबाई आंबेडकर वर्किंग वुमन्स होस्टेल व विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग दिला. शाखेतील सहकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक करून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून गौरव केला.
...............
नेरूळमध्ये दाखले वाटप उपक्रम
नेरूळ (बातमीदार) ः माजी आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ सेक्टर-२० येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि सरकारी दाखले वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात रहिवासी दाखले, उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक कार्ड, नॉन क्रिमीलेयर व जात प्रमाणपत्र मोफत मिळणार आहेत. दंत तपासणी, बीपी, शुगर, थायरॉइड, डोळे तपासणी इत्यादी सेवांचा लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प ट्रस्ट, काशीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व इतर सामाजिक संस्थांनी केले आहे.
..............
उरणमध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन
उरण (वार्ताहर) ः १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या विशेष महसूल सप्ताहात उरण तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना विविध प्रकारचे जमिनीविषयक दाखले वितरित करण्यात येत आहेत.
या सप्ताहात कोप्रोली, विंधणे, नागाव, म्हातवली अशा गावांमध्ये शिवराज्यभिषेक अभियानांतर्गत मंडळनिहाय दाखले वाटप करण्यात येणार आहे. संजय गांधी योजनेंतर्गत डीबीटी प्रक्रिया न झालेल्या २९ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com