खड्ड्यांत अडकलेले रस्ते!

खड्ड्यांत अडकलेले रस्ते!

Published on

भिवंडी, ता. २ (बातमीदार) : भिवंडी महापालिका क्षेत्रात डांबरी रस्त्यावर मागील महिन्यापासून झालेल्या पावसामुळे मोठ्या संख्येने खड्डे झाले आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डांबरी रस्ता बनविण्यासाठी पालिका प्रशासन खर्च करते आणि नंतर रस्त्यात खड्डे झाल्यावर ते भरण्यासाठी नागरिकांचा पैसे खर्च करते. प्रशासनाच्या अशा व्यवहाराची नागरिकांनी चौकशी करण्याची मागणी वाढू लागली आहे.
भिवंडीत दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. खड्ड्यांमुळे पादचारी, वृद्ध आणि विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. वऱ्हाळा तलावाच्या काठावर एमएमआरडीएद्वारे सिमेंटचा रस्ता बांधला जात आहे. परंतु सिमेंट रस्त्याच्या कामाची गती मंदावल्याने काही ठिकाणी हे काम अपूर्ण राहिले आहे. अपूर्ण कामामुळे गायत्री बिल्डिंगजवळील रस्त्यावर मोठे, जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला सांडपाणी आणि गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत पडले आहे. शहरातील तीन बत्ती भागात खरेदीसाठी विविध भागांतून महिला-पुरुष आल्याने येथे प्रचंड गर्दी आणि वाहनांची वर्दळ असते. दुचाकीस्वार अनेकदा घसरून खड्ड्यांमध्ये पडतात.
शहरातील नागरिकांना जुनी भिवंडीहून तीन बत्ती मार्केटमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी कोटरगेट हा मुख्य मार्ग आहे. या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. कोटरगेट मशिदीसमोरून पांजरापोळ येथील निजामपुराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अलिकडेच, बकरी ईददरम्यान या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते; परंतु निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे, पाऊस पडताच डांबर वाहून गेले. परिणामी, रस्त्यावर पुन्हा खड्डे दिसून येत आहेत. दरवर्षी ईद-ए-मिलादच्या वेळी या रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणावर महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात; परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याला पुन्हा खड्डे पडतात. एसटी आगाराजवळ सिमेंटचा रस्ता बांधला आहे; मात्र रस्त्यालगतचे पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. त्यामुळे तिथे मोठे खड्डे पडले आहेत. तसेच महानगर गॅससमोरही जीवघेणे खड्डे आहेत. हे खड्डे भरण्याचे काम पालिकेकडून केले जात आहे.

खड्ड्यांचा मार्ग धोक्याचा
दुसरीकडे मंडईच्या आधी बॉम्बे फरसाण ते बंगालपुरा या रस्त्यावरून प्रवास करणे दुचाकीस्वारांसाठी धोक्यापेक्षा कमी नाही. खड्ड्यांमुळे संपूर्ण रस्ता तलावात रूपांतरित झाला आहे. ज्यामध्ये अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. धांगे रुग्णालय ते मंडई या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गौरीपाडा-खजूरपुरा रोड, हिंदुस्थानी मशिदीजवळील मुर्गी बाजार आणि समद नगरसह इतर रस्त्यांवर विविध ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

--------------------------
रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी भिवंडी महापालिकेकडून दरवर्षी अंदाजे ७.५ कोटी रुपये खर्च केले जातात; परंतु कमिशनच्या अफरातफरीमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये वाया जातात. कंत्राटदाराला कमिशन दिल्याशिवाय त्यांचा धनादेश वठत नाही.
- फराज बहाद्दीन बाबा, माजी नगरसेवक

--------------------
रस्ते खोदल्यामुळे शहराच्या आतून बाजारपेठेत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. शहरातील बहुतेक रस्त्यांवर खड्डे आहेत. सिमेंट केलेले सर्व रस्ते अपूर्ण आहेत.
- प्रदीप राका, अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशन

------------------------
पावसाने शहरात झालेल्या खड्ड्यांत मिश्र गिट्टी टाकून भरण्याचे काम केले जात आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन आहे. त्यासाठी अंदाजे १० कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यासाठी निविदाही मागवल्या होत्या. पावसाळ्यानंतर सर्व रस्ते डांबरीकरण केले जातील. याशिवाय नाल्यांवर बसवलेल्या चेंबर्सचे झाकण गायब झाले आहेत. झाकण बसवण्याचे नियोजनही केले आहे. प्रत्येक विभाग समितीमध्ये अंदाजे ५० लाख रुपयांचे बजेट ठेवले आहे.
- जमील पटेल, शहर अभियंता, भिवंडी महापालिका
-------
शहरातील बहुतेक रस्ते आरसीसी केले जात आहेत. महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन केले आहे. या वेळी ते अशा प्रकारे बनवले जातील की किमान एक वर्ष रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत.
- अनमोल सागर, महापालिका आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com