शिल्प चौकातील पोलिस चौकी फेरीवाल्यांच्या ताब्यात

शिल्प चौकातील पोलिस चौकी फेरीवाल्यांच्या ताब्यात

Published on

शिल्प चौकातील पोलिस चौकी फेरीवाल्यांच्या ताब्यात
रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी; फळे ठेवण्यासाठी होतो वापर
खारघर, ता. ३ (बातमीदार) ः खारघरमधील सर्वात गजबलेल्या शिल्प चौकात पोलिसांनी उभारलेल्या चौकीचा उपयोग फेरीवाल्यांकडून फळे ठेवण्यासाठी केला जात असल्यामुळे खारघरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गस्तीवरील पोलिसांना विश्रांती देण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही चौकी उभारली होती, मात्र सध्या ही चौकी पोलिसांच्या देखरेखीअभावी बेवारस स्थितीत आहे.
खारघरमध्ये घरफोडी, मंगळसूत्र चोरीला आळा घालण्यासाठी आणि गस्तीवर असलेल्या पोलिसांना विश्रांती मिळावी, यासाठी पोलिसांनी सेक्टर-२० येथील शिल्प चौक आणि ओवे गावच्या शेजारी पोलिस चौकी उभारली आहे. विशेष म्हणजे खारघरमधील सर्वात वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जाणाऱ्या शिल्प चौकातील पोलिस चौकीचा उपयोग मात्र मागील काही काळापासून फेरीवाले फळे ठेवण्यासाठी करत आहेत. त्‍यामुळे रहिवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे या चौकीला टाळे नाही. रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपूर्वी शिल्प चौक येथील पोलिस चौकीत एका फेरीवाल्याने गॅस सिलिंडरसह संसार थाटला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी खारघर पोलिस ठाण्याच्या वतीने सोनसाखळी खेचणे, घरफोडी, जबरी चोरी, खून, अपघात अशा दैनंदिन घडणाऱ्या घटनांचे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने घर, सोसायटी आणि दुकानांतील मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी सूचना केली होती. पोलिस एकीकडे सुरक्षेविषयी लक्ष केंद्रित करीत असताना जनतेच्या हितासाठी उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीचा उपयोग फेरीवाले फळे ठेवण्यासाठी करीत असल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
................
दरम्यान, खारघरमधील सेक्टर-३० ते ४० पर्यंत पसरलेल्या सिडको वसाहतीसह ओवेगाव, ओवेकॅम्प, फारसीपाडा, घोळवाडी, कुटूक बांधन आणि रांजणपाडा या परिसरात एक लाखाहून अधिक लोकवस्ती आहे. या भागात पूर्वी गुन्हा घडल्यास रहिवाशांना थेट तीन किलोमीटरवर असलेल्या खारघर पोलिस ठाण्यात जावे लागत असे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा आणि गुन्हेगारी घटनांचा विचार करून पोलिस चौकीची आवश्यकता होती. त्याच अनुषंगाने सुमारे १० वर्षांपूर्वी सेक्टर-३० मधील ओवेगाव परिसरात पोलिस चौकी सुरू करण्यात आली होती. येथे एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि दोन कर्मचारी तैनात केले होते, परंतु सध्या पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे ही चौकी निष्क्रिय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com