‘रिंग रेल्वे’ची संकल्पना प्रवाशांच्या मूळावर!
‘रिंग रेल्वे’ची संकल्पना प्रवाशांच्या मुळावर!
माहितीअभावी गोंधळ; रेल्वे बोर्डाकडे प्रस्तावच नाही
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीवरील ताण, वाढती लोकसंख्या आणि उपनगरी रेल्वेची गती यावर तोडगा म्हणून ‘रिंग रेल्वे’ची संकल्पना चर्चेत आणण्यात आली; मात्र ही योजना प्रत्यक्षात केवळ अव्यवहारी नसून, ती अमलात आणल्यास प्रवाशांच्या वेळेचा, पैशाचा आणि संयमाचा प्रचंड अपव्यय होणार आहे. शिवाय यामागे कोणतीही अधिकृत योजना किंवा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर झालेला नाही, हेही आता स्पष्ट झाले आहे.
मुंबईकडे दररोज येणाऱ्या २०० पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या आहेत. यामधील १०० पेक्षा जास्त गाड्या कल्याण स्थानकापर्यंत आणून पुढे त्या पनवेल-पुणे-दौंडमार्गे नाशिक किंवा मनमाडकडे वळवण्याची ‘रिंग रेल्वे’ संकल्पना होती; जेणेकरून मुंबई उपनगरातील उपनगरीय लोकल आणि टर्मिनसवरील भार कमी होईल, असा निष्कर्ष रेल्वे अधिकाऱ्यांनी काढला होता. मात्र या पर्यायी मार्गामुळे कल्याण ते मनमाडचे अंतर २०७ किलोमीटरवरून जवळपास ४२५ किलोमीटरवर पोहोचते. म्हणजेच एका प्रवासात २१८ किमी वाढ होईल. तसेच प्रवाशांना जास्त वेळ आणि आर्थिक भुर्दड सहन करावा लागणार आहे.
असा आर्थिक फटका बसणार
रेल्वेच्या सध्याच्या दरानुसार (साधारण रु. ०.४५ प्रति किलोमीटर, स्लीपर क्लास), २१८ किलोमीटर वाढीचा प्रवास प्रत्येक प्रवाशाला ९८ ते १५० रुपयांपर्यंत जास्तीचे भाडे मोजावे लागेल. वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हेच अंतर २५० ते ४५० रुपयांपर्यंत महाग होऊ शकते. एका गाडीमध्ये १,००० प्रवासी धरले, तर एका फेरीला एक ते तीन लाख रुपयांचा अतिरिक्त भाडे भार प्रवाशांवर येऊ शकतो. महिन्याच्या हजारो फेऱ्या गृहीत धरल्या तर हा आकडा कोट्यवधींमध्ये पोहोचतो.
प्रवासाचा वेळ दुपटीने वाढणार
आधीच्या प्रवासाची वेळ दुपटीने वाढणार आहे. इंधनाचा वापर, क्रूच्या ड्युटी बदल्या, स्थानकांची क्षमता आणि देखभाल यांवरही यामुळे ताण वाढणार आहे.
प्रवासी संघटनांचा विरोध
ही योजना म्हणजे प्रवाशांच्या दृष्टीने वेळखाऊ, महागडी आणि पूर्णतः गैरसोयीची आहे. गाड्यांचे वेळापत्रक, फलाटांची उपलब्धता, स्थानकांची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांचा वेळ हे सर्व घटक लक्षात घेतल्यास ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे म्हणजे प्रवाशांच्या मुळावर उठणे ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटना व्यक्त करीत आहेत.
संकल्पना फेटाळून लावली
सध्या सणासुदीच्या कालावधीत रेल्वेला विशेष गाड्यांचे नियोजन, लोकल गाड्यांचे वेळापत्रक आणि फलाट उपलब्धता यांचा समन्वय साधणे हेच मोठे आव्हान असते. ‘रिंग रेल्वे’सारखी वेगळी व खर्चिक संकल्पना प्रत्यक्षात आणल्यास हे नियोजन कोलमडले. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने प्राथमिक चर्चेच्या टप्प्यावरच ही संकल्पना फेटाळून लावली आहे.
चुकीच्या माहितीवरून निर्माण झालेला संभ्रम
या योजनेबाबत आजवर रेल्वे बोर्डाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव सादर झालेला नाही. काही रेल्वे अधिकाऱ्यांनी खासगी चर्चेत ही संकल्पना मांडली होती, मात्र त्याचाच विपर्यास काही माध्यमांमध्ये होऊन सार्वजनिक चर्चेला वाव देण्यात आला. त्यातून प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, असे बोलले जात आहे.
थेट मार्ग आणि रिंग मार्ग
प्रवास मार्ग अंतर - अंदाजे वेळ - स्लीपर भाडे - एसी भाडे
कल्याण - मनमाड -(थेट)२०७ किमी ४-५ तास ९५ - ११० / २४०- ३००
रिंग मार्गाने (पनवेल–पुणे–दौंडमार्गे)४२५ किमी ८-९ तास / १९०-२३०/ ५००-६००/
काय परिणाम?
वेळेचा दुप्पट अपव्यय, भाड्याचा अतिरिक्त बोजा, प्रवासाचा मानसिक व शारीरिक थकवा, रेल्वे व्यवस्थापनावर नियोजनाचा ताण
रेल्वे प्रशासनाने ही संकल्पना अधिकृतरीत्या मांडलेली नसतानाही काही माध्यमांतून ती चर्चेत आणल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडतोय. माहिती आणि नियोजनाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या अशा गोंधळांपासून प्रवाशांचा बचाव होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
रेल्वे प्रशासनाने ही संकल्पना अधिकृतरीत्या मांडलेली नसतानाही काही माध्यमांतून ती चर्चेत आणल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडतोय. माहिती आणि नियोजनाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या अशा गोंधळापासून प्रवाशांचा बचाव होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.