अलिबाग नगरपरिषदेची हद्द वाढणार

अलिबाग नगरपरिषदेची हद्द वाढणार

Published on

अलिबाग नगर परिषदेची हद्द वाढणार
एका ग्रामपंचायतीशी चर्चा सुरू; मुख्याधिकाऱ्यांची माहिती
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) ः जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेच्या हद्दीलगतच्या चेंढरे, वरसोली, वेश्वी आणि कुरूळ, आक्षी या ग्रामपंचतींचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या तोंडी आदेशानुसार अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी सचिन बच्छाव यांनी हद्दवाढीबाबत ग्रामपंचायतींकडून हरकती मागवल्या आहेत. या ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींनी अनुकूलता दर्शविली असून, कुरूळ ग्रामपंचायत अजूनही अनुकूल नसल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी सचिन बच्छाव यांनी सांगितले आहे.
सध्या अलिबाग नगर परिषदेचा कारभार मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून सचिन बच्छाव यांच्या देखरेखेखाली सुरू आहे. अलिबाग नगर परिषद हद्दीतील लोकसंख्या पाहता ती दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या हद्दीलगतच्या चेंढरे, वरसोली, वेश्वी आणि कुरूळ, आक्षी या ग्रामपंचतींचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या निर्णयाला चारपैकी एका म्हणजे कुरूळ ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आगामी काळात या ग्रामपंचायतीबाबत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सद्य:स्थितीत वेश्वी ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे. अलिबाग नगरपालिकेची सध्याची हद्द जेमतेम ६ किमी इतकीच आहे. लगतच्या ग्रामपंचायतींना सहभाग करून घेतल्यानंतर ही हद्द २५ किमीपर्यंत वाढणार आहे. सध्या शहरातील पाणीप्रश्नासह वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अपूर्ण रस्त्यांच्या कामाचा फटका अलिबागकरांना बसत आहे. अगदी छोट्याशा जागेत अलिबाग शहर वसले असल्याने त्यास बकालपणा येत आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्याबाबतही अलिबागकर त्रस्त झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी सध्या नवीन बांधकामे सुरू आहेत. हे प्रश्न सोडविण्यास नगर परिषद प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे अतिरिक्त लोकसंख्येचा भार उचलण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज आहे का, याबाबत प्रथम विचार करून मगच निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
....................
चैकट:
नगर परिषद हद्दीत भेडसावणाऱ्या समस्या
१. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांचे अपुरे काम
२. कचऱ्याचा प्रश्न गंभीर
३. अनेक इमारती, घरांमध्ये पाण्याचा प्रश्न
४. अरुंद रस्ते
५. वाहनांच्या पार्किंगची समस्या
६. रस्त्यावरील अतिक्रमणे
..............
चौकट :
सध्याची नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या : २२ हजार
या ग्रामपंचायतींची हरकत : कुरूळ
या ग्रामपंचायती अनुकूल : वेश्वी, वरसोली, चेंढरे
..............
चौकट :
अलिबाग नगर परिषदेसाठी नगरोत्थान योजनेंतर्गत ६० कोटींची पाणीयोजना मंजूर झाली असून, त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत शहराची पाणी समस्या सुटणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतींना नगर परिषदेमध्ये समावेश झाल्यानंतर विविध सुविधा नागरिकांना पुरविणे शक्य होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नसल्याने त्यांचा कचरादेखील अलिबागमधील डंपिंग ग्राउंडमध्ये टाकतात. त्यामुळे या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, मात्र तो मंजुरीअभावी रखडला आहे.
..............
कोट :
आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेल्या तोंडी आदेशानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हद्दवाढीने अलिबाग शहराचा सुनियोजित विकास करता येईल, त्याचबरोबर वरसोली, चेंढरे, वेश्वी, कुरूळ या ग्रामपंचायतींचा योग्य विकास होईल. २५ चौ.किमी हद्दीत विविध कार्यालये सुरू करता येतील. पाणी योजनेचे काम सुरू झाल्याने येत्या दोन वर्षांत पाणी समस्याही दूर होणार आहे.
- सचिन बच्छाव, मुख्याधिकारी, अलिबाग नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com