धसईत बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला
टोकावडे, ता. ५ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील धसई-म्हसा रोडलगत असलेल्या धसई -खेवारे-महाज भागात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. धसई येथील रहिवासी राजू पटेल यांच्या पाळीव कुत्र्यावर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून धसई, खेवारे, महाज या परिसरात बिबट्याचे हालचाली सातत्याने दिसून येत होत्या. अनेक वेळा नागरिकांनी रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले. वनविभागाकडून योग्य पावले उचलावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पटेल यांच्या घरासमोर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर धसई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आणि वयोवृद्ध नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याचा धसकाच बसला आहे. विद्यार्थी दिवसाही शाळेमध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत.
...............
वनविभागाकडून जनजागृती
रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नये, रात्री घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करावेत. बिबट्याबद्दल जनजागृती करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती टोकावडे वन अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आली.