अवजड वाहने आजही सुसाट

अवजड वाहने आजही सुसाट

Published on

बदलापूर, ता. ५ (बातमीदार) : वालीवली चौकात नियंत्रण सुटलेल्या अवजड ट्रकने शनिवारी (ता. २) सरसकट अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला, तर सात ते आठ जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाही या अरुंद आणि उतरणीच्या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या अरुंद रस्त्यावर भरधाव अवजड वाहनांना नियंत्रण मिळवणे अवघड जाते. त्यामुळे त्यांना बंदी घालण्याची गरज आहे. संबंधित प्रशासनाने अजून अपघातांची वाट न पाहता त्यावर योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.

बदलापूर पश्चिमेकडील अंबरनाथकडून येणारा रस्ता हा वडवलीमार्गे बारवी धरण आणि मुरबाड-माळशेज घाटामार्गे पश्चिम महाराष्ट्राला जोडला आहे. त्यामुळे राज्यातून किंवा परराज्यातून अवजड वाहनांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. बडवलेमार्गे बारवी धरणाकडे जाणारा हा शॉर्टकट रस्ता आहे. डोंगररांगातून निघालेला हा रस्ता मोठ्या प्रमाणात उतरणीचा आहे. त्यामुळे अनेकदा अवजड वाहनांवर नियंत्रण मिळवणे वाहनचालकांना कठीण जाते. यामुळे यापूर्वीही अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी घडलेल्या अपघातात अनेक वाहनांचा चुराडा झाला. त्यात एकाला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले. सतत घडणाऱ्या अपघातांची मालिका पाहता या अवजड वाहनांना या रस्त्यावरून बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. रस्त्याच्या कामाची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे दिली आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासन मोठे अपघात होण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.


‘तो’ फलक गायब
हा रस्ता एमआयडीसीच्या अखत्यारीत येत असल्याने काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीने या ठिकाणी ‘अवजड वाहनांना प्रवेश नाही’ अशा आशयाचा फलक लावला होता; मात्र आता तो फलक नाही. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीवर संबंधित प्रशासनाचे कोणतेही निर्बंध राहिले नाही. सतत अपघाताच्या घटनांचा अभ्यास करून या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

पोलिस प्रशासनाला पत्र पाठवणार
हा रस्ता एक महिन्यापूर्वीच आम्हाला हस्तांतरित केला आहे. इथल्या अपघातासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन पोलिस प्रशासनाला पत्र पाठवण्यात येईल. अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यासंदर्भात सांगण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे अभियंता दिलीप हिंगे यांनी दिली.


दोन दिवसांपूर्वी घडलेला अपघात अतिशय भयानक होता. या भागात राहताना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे लागते. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली होती. मात्र, आज ही बंदी नसल्याने सर्रासपणे वाहतूक सुरू आहे. भविष्यात असे गंभीर अपघात घडू नयेत म्हणून प्रशासनाने पुन्हा एकदा वाहनांना बंदी घालावी.
- अक्षय टक्के, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com