उपाशीपोटी फवारणी जीवावर बेतणारी चूक!

उपाशीपोटी फवारणी जीवावर बेतणारी चूक!

Published on

उपाशीपोटी फवारणी जीवावर बेतणारी चूक!
पालघरमध्ये कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

पालघर, ता. ५ (बातमीदार) : जिल्ह्यात सध्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी केली जात आहे; मात्र उपाशीपोटी फवारणी करणे, वाऱ्याच्या दिशेने फवारणी करणे किंवा फवारणीवेळी मास्क न घालणे यांसारख्या चुका शेतकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण करीत आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी सांगितले, की कीटकनाशकांची फवारणी करताना नेहमी पूर्ण अंग झाकणारे कपडे, हातमोजे, बूट व मुखपट्टी वापरणे आवश्यक आहे. उपाशीपोटी फवारणी केल्यास विषबाधेचा धोका अधिक असतो.

वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी टाळा
फवारणी करताना वाऱ्याची दिशा ओळखा आणि वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी टाळा, अन्यथा औषध श्वसनातून शरीरात जाऊन जीवघेणा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.
-------------------
माहितीपत्रक जरूर वाचणे
फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या बाटलीवरील लेबल व सूचना काळजीपूर्वक वाचूनच वापरावे. कोणतेही औषध अंदाजाने किंवा इतरांच्या सल्ल्यावरून वापरू नये.
---------------------------
हवा फुंकू नये
फवारणी करताना नळीमध्ये अडथळा आल्यास तोंडाने फुंकर मारणे टाळावे. यामुळे कीटकनाशक तोंडातून आत जाऊन विषबाधा होण्याची शक्यता असते.
---------------------

शेती करताना कीटकनाशक हे एक गरजेचे साधन आहे; मात्र त्याचा वापर करताना थोडीशीही बेपर्वाई जीवावर बेतू शकते. शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने व सुरक्षिततेसह फवारणी करावी.
- सोमनाथ पिंजारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी

Marathi News Esakal
www.esakal.com