नेवाळी चौकात १४ लाखांचा एमडी जप्त
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर उल्हासनगर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कारवाई केली आहे. नेवाळी चौक परिसरात बंद असलेल्या ढाब्यात विक्रीसाठी आणलेले ७१ ग्रॅम एमडी अमली पदार्थ एका महिलेच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे. बाजारभावानुसार याची किंमत १४ लाख ३१ हजार १२० रुपये आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी (ता. ४) सायंकाळच्या सुमारास नेवाळी चौक परिसरात ही कारवाई केली. काटईकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका बंद ढाब्यावर एक महिला एमडी विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत तातडीने छापा टाकला. नौशिन मैनुद्दीन शेख या महिलेला रंगेहाथ अटक केली. तिच्याकडून ७१ ग्रॅम एमडी हस्तगत केले असून, बाजारातील किंमत जवळपास १४ लाख ३१ हजार १२० रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता, तिने इम्रान हबीब खान याच्याकडे अमली पदार्थ खरेदी केल्याचे उघड झाले. सध्या पोलिस इम्रान खानचा शोध घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, तो फरार आहे.