गायमुख खड्डेमुक्तीसाठी शुक्रवारपासून ब्लॉक

गायमुख खड्डेमुक्तीसाठी शुक्रवारपासून ब्लॉक

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : घोडबंदर-गायमुख मार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवरून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कानउघडणी केल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसांत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यासाठी सर्वप्रथम या मार्गावरील चाळण झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. एकही खड्डा राहता कामा नये आणि पुन्हा पडता कामा नये, या तत्वावर शुक्रवार (ता. ८)पासून तीन दिवस २४ तास या मार्गावर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक विभाग ब्लॉक घेणार असून लवकरच यासंबंधीची अधिसूचना काढण्यात येणार आहे.

घोडबंदर आणि गायमुख रस्त्याची चाळण, कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. अर्धा तासाच्या प्रवासासाठी दोन तास लागत आहेत. यासंदर्भात सर्वसामान्यांसह सेलिब्रेटींनीही टिकेची झोड उठवली, पण रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यापलिकडे काहीच झाले नाही, पण उपमुख्यमंत्री शिंदे यांना पालघर दौऱ्यादरम्यान या रस्त्याच्या दयनीय अवस्था दिसली. त्यांनी तत्काळ सोमवारी (ता. ४) ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी, वाहतूक पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कानउघडणी केली. त्यामुळे आता संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी बैठकीनंतर लगेचच घोडबंदर मार्गावरील तत्वज्ञान विद्यापीठ ते भाईदरपर्यंत तत्काळ स्थळपाहणी केली. त्यांच्यासमवेत वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ठाणे पालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता संजय कदम, तहसीलदार उमेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे, शाखा अभियंता प्रसाद सनगर व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

समन्वयातून समस्येचे निराकरण
स्थळपाहणीनंतर पुढील अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात रात्री उशिरा बैठक घेतली. रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडीसंदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवार (ता. ८)पासून पुढील तीन दिवसांत रस्ते वाहतूक अंशतः ब्लॉक करण्याचा निर्णय झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरा-भाईंदर पालिका आणि ठाणे पालिकेचा बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वनविभाग यांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून एकजुटीने या समस्येचे निराकरण कोणत्याही परिस्थितीत करण्याचे ठरले.

टिकाऊ तंत्रज्ञान वापरून खड्डे भरणार
गायमुख घाटात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. वनविभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा रस्ता काँक्रीटचा करणे शक्य नाही. त्यामुळे सध्यातरी या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवून दिलासा देणे हा एकमेव पर्याय आहे. पण त्यासाठी देशातील सर्वोत्तम असे टिकाऊ तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तीन दिवस, २४ तास काम
खड्डेमुक्तीची ही मोहिम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. २४ तास न थांबता हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यतेनुसार एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी या मार्गावर रहदारी कमी असते. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून रविवारी (ता. १०) रात्रीपर्यंत वाहतूक विभाग ब्लॉक घेण्याची शक्यता आहे. या कालावधीत या मार्गावरील सर्व खड्डे भरले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com