मोबाईल चोरटा जेरबंद
मोबाईल चोरटा जेरबंद; प्रवाशाने पकडून केले पोलिसांच्या हवाली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ ः ठाणे रेल्वे स्थानकात सध्या मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. अशाच, एका चोराला मोबाईल फोन चोररताना प्रवाशांनी पकडले आहे. मोहम्मद झुल्फिकार जमील अहमद शेख (वय ३२) असे त्याचे नाव आहे. लोकलमधून उतरताना मोबाईल फोन चोरून पळणाऱ्या मोहम्मदला दोन मित्रांनी पकडले. आणि त्याला ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केल्याचे संतोष यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे.
संतोष यादव हे सोमवारी (ता. ४) अभिमन्यू यादव याच्या कामानिमित्त कल्याण येथे गेले होते. काम झाल्यानंतर दोघेही परत ठाण्याला येण्यासाठी कल्याण फलाट क्रमांक चारवर आल्यावर धीमी लोकलच्या जनरल डब्यात चढले. दुपारी तीनच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक चारवर लोकल येताच त्यामधून उतरताना यादव यांना खिशातून मोबाईल फोन कोणीतरी काढल्याचे जाणवले. म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले असता एक व्यक्ती हा लगबगीने निघून जाताना दिसला. म्हणून तातडीने त्या दोघांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि रेल्वे स्थानकावरील पोलिसांच्या हवाली केले. अंगझडतीत यादव यांचा १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन मिळून आला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्र्यातील मोहम्मद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे