राखीच्या धाग्यात गुंफूया निसर्गाचे स्वप्न
राखीच्या धाग्यात गुंफू या निसर्गाचे स्वप्न
एमएमके प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम
मुंबई, ता. ५ ः आपल्या भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरम्यान, कालपरत्वे दिखाव्याच्या या जगात राखीसाठी वापरले जाणारे साहित्य प्रदूषण वाढवत आहे. अशा वेळी आपण पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धक राख्यांची निर्मिती करून सर्वांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊ या, अशी संकल्पना एमएमके प्राथमिक विद्यालयात राबवण्यात येत आहे.
संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एमएमके प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बीज राख्यानिर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. शाळेतील २८९ विद्यार्थ्यांनी बीजराख्यांची निर्मिती केली. या कार्यशाळेत विविध प्रकारची झाडे, फळझाडे, फुलझाडे व फळभाज्यांच्या बिया वापरून स्वतःच्या कल्पनेने विविध प्रकारच्या राख्या बनवल्या आहेत. प्रत्येक सणानंतर निर्माण होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट ही आपली डोकेदुखीच बनते. यावर उपाय म्हणून बीजराखीसाठी वापरलेला दोरा, पुठ्ठा आणि कागद ह्या गोष्टी मातीत विघटित होतील आणि बिया मातीत रुजतील. त्याचेही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
शुक्रवारी (ता. ८) शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केल्यानंतर विद्यार्थी या बीजराख्या खुल्या जागेवर, मैदानात, बागेत किंवा कुंडीत रुजण्यासाठी मातीत लावणार आहेत. त्यापासून नवीन रोपे येण्यास मदत होणार आहे. शाळेचे विद्यार्थी आपल्या शिक्षकांबरोबर जाऊन चुनाभट्टी परिसरात लोकप्रतिनिधी, पोलिस ठाणे, रेल्वे स्थानक, बँक, पोस्ट कार्यालय, रुग्णालय आदी ठिकाणी जाऊन तेथील कर्मचारी व अधिकारी यांना बीजराखी बांधून पर्यावरण जतन व संवर्धनाचा संदेश देणार आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर पालकही सहभागी होणार आहेत.
बीजराखीच्या अभिनव उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता सरमळकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक यांचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला गोस्वामी, सचिव प्रणिता भारती, शिक्षण निरीक्षक भारती भवारी व परिसरातील नागरिक यांच्याकडून करण्यात येते आहे.