कृत्रिम विसर्जन व्यवस्थेवर पालिकेचे भर
कृत्रिम विसर्जन व्यवस्थेवर पालिकेचा भर
तलावांची संख्या १५ वरून २४ वर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाणे पालिका प्रशासनाने यंदाच्या वर्षी गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यानुसार गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांची गैरसोय टाळण्याबरोबर कृत्रिक विसर्जन व्यवस्थेचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन करीत फिरती विसर्जन व्यवस्था एकने आणि टाकी विसर्जन व्यवस्था ४९ वरून ७४ करण्यात आली आहे. याशिवाय कृत्रिम तलावांची संख्या १५ वरून २४ करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
निर्णयानुसार सहा फुटांच्या आतील गणेशमूर्ती यापुढे कृत्रिम तलावात विसर्जन केल्या जातील, असेही पालिकेने स्पष्ट केले. पालिका सौरभ राव यांच्या निर्देशानुसार बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. यामध्ये नऊ विसर्जन घाट, २४ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्रे आणि ७४ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि १५ फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार आहे.
मूर्ती स्वीकृती केंद्रे
लोढा, जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाइट्स-आझादनगर, लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसननगर बस स्टॉप, मॉडेला चेकनाका, देवदयानगर-शिवाईनगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.
विसर्जन व्यवस्था
आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, पालिकेने गेल्या वर्षापासून खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजीनगर कळवा तलाव, नीळकंठ वूड्स-टिकूजीनीवाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी, रायलादेवी- १ रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा इतर ठिकाणी मिळून २४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोपरी, पारसिक रेती बंदर, रेती बंदर -१, रेती बंदर- २-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा नऊ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.
‘त्या’ मंडळांना मिळणार १० वर्षांसाठी परवानगी
मागील १० वर्षे उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेश उत्सव मंडळांना एकदाच पुढील १० वर्षांसाठी परवानगी दिली जाणार आहे. पाच वर्षांची परवानगीदेखील आता एकदाच दिली जाणार आहे. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांना वारंवार खेटे घालावे लागणार नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.