गणेशोत्सवाच्या देणगीमुळे मंडळाकडून व्यापारी त्रस्त
गणेशोत्सवाच्या देणगीसाठी व्यापाऱ्यांवर ताण
मंदावलेला व्यवसाय, ऑनलाइन खरेदीचा फटका; देणग्या मिळवण्यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा
खारघर, ता. ६ (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, खारघर परिसरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सज्जता सुरू केली आहे. या तयारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांकडे अनेक मंडळांकडून देणगीसाठी तगादा लावला जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे खारघरमधील अनेक व्यापारी त्रस्त असल्याचे चित्र आहे.
खारघरमधील वसाहती वाढल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. खारघरमध्ये सुमारे ६० मंडळे सार्वजनिक गणेशाची स्थापना करतात. शिवाय याचा आकडा वाढतच जात आहे. पूर्वी बरेचदा स्थानिक बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असत, तसेच व्यापारीवर्गही स्वखुशीने योगदान देत असे. परंतु कोरोनानंतरच्या काळात व्यापाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय घसरण झाली आहे. त्यातच ऑनलाइन खरेदीला मिळणारा प्राधान्यक्रम, महागाई आणि वाढलेले संचालन खर्च यामुळे त्यांच्यावर दुहेरी आर्थिक ताण आला आहे. दुसरीकडे मंडळांच्या खर्चात मात्र प्रचंड वाढ झाली आहे. मंडप उभारणी, देखावे, सीसीटीव्ही, साउंड सिस्टीम, लायटिंग यासारख्या घटकांचा खर्च दुपटीने वाढला आहे. त्यात ‘जिवंत देखाव्यां’साठी येणारे कलाकारही मानधनात वाढ मागत आहेत. त्यामुळे अधिकाधिक देणग्या मिळवण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध दुकानांत जाऊन आग्रहाने वर्गणी मागत आहेत. या मागण्यांमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे.
...............
अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले, की मागणीपेक्षा समजूतदारपणा आवश्यक आहे. देवाच्या उत्सवासाठी मदतीला नकार नाही, पण अतिरेक त्रासदायक ठरतो. यासंदर्भात व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी अंबाजी पटेल यांनी सांगितले, की पूर्वी व्यापारी स्वखुशीने देणगी देत असत. कोरोनानंतर मात्र परिस्थिती बदलली आहे. ऑनलाइन खरेदीमुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. अशा स्थितीत देवाच्या नावाने मिळेल ती देणगी आनंदाने स्वीकारावी, अति मागणी करू नये.
..................
चौकट :
मंडप, देखावे, मूर्ती, साउंड सिस्टीम यांचे वाढलेले दर
जिवंत देखावे उभे करणाऱ्या कलाकारांच्या मानधनात वाढ
देणग्या मिळवण्यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा, पदाधिकाऱ्यांत चढाओढ
व्यापाऱ्यांवर ताण, मंदावलेला व्यवसाय, ऑनलाइन खरेदीचा फटका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.