मेट्रो स्थानकांना वादाचे थांबे
मेट्रो स्थानकांना वादाचे थांबे
अडथळ्यांमुळे कोंडीची शक्यता; जिने उतरल्यावर रस्ता ओलांडणे धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : घोडबंदर रोडवरील कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या आठ मेट्रो स्थानकांच्या जिन्यांवरून प्रवासी भर रस्त्यात उतरत असल्याने, त्याखाली स्वतंत्र प्रवासी थांबे तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या योजनेनुसार सेवा रस्ता फक्त बस, एसटी, रिक्षा आणि टॅक्सी यांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे; मात्र या पर्यायी थांब्यांमुळे वाहतूक नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मेट्रोने प्रवास करणारे आणि पुढे पायी जाणारे प्रवासी यांसाठी यापुढे काय उपाय करायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच प्रस्तावित थांब्यांमुळे परिसरात बॉटलनेक होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे.
घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या नावाखाली येथील मुख्य रस्त्यात दोन्ही बाजूंचे सेवा रस्त्यांचे विलीनीकरण करण्यात आले. त्यासाठी एमएमआयडीएने तब्बल ६०० कोटी रुपये खर्च केले; मात्र हे विलीनीकरण करत असताना घोडबंदर रोडवरील मेट्रो-४ प्रकल्पांच्या आठ स्थानकांचे जिन्यांचा विचार केला गेला नाही. आधी हे जिने सेवा रस्त्यांवर उतरत असल्याने फारसा धोका नव्हता; पण रस्ता विलीनीकरणानंतर प्रशस्त झालेल्या घोडबंदर मार्गाच्या रस्त्यावर मधोमध मेट्रो स्थानकांचे जिने आले आहेत. यासंदर्भात दैनिक ‘सकाळ’ने यापूर्वीच लक्ष वेधले होते. शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनीही या मुद्दावरून आवाज उठवत ठाणे महापालिका, वाहतूक विभाग आणि एमएमआयडीएकडे पत्रव्यवहार केला. याची दखल घेत परिवहनमंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी सोमवारी पाहणी दौरा करत मेट्रो स्थानकासाठी स्वतंत्र प्रवासी थांबे तयार करण्याची सूचना केली.
कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या आठ मेट्रो स्थानकांच्या खाली जिन्यालगत पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण या योजनेनुसार करण्यात येणार आहे. त्यासाठी सेवा रस्ता आरक्षित करून तेथून बस, एसटी, रिक्षा व टॅक्सी या वाहनांखेरीज इतर वाहने येऊ नयेत, असे सूचना फलक लावण्याचे निर्देश एमएमआरडीए, महापालिका व वाहतूक अधिकाऱ्यांना परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत; पण हा उपाय म्हणजे रोगापेक्षा औषध जालिम असाच असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. सगळेच मेट्रो प्रवासी काही बस, एसटी, रिक्षा वा टॅक्सीने जाणारे नसतात. अनेकजण पायीही जाणारे असल्याने त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नरेश मणेरा यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा
१. कापूरबावडी ते गायमुखच्या आठ मेट्रो स्थानकांवर एकूण २८ उतरते जिने आहेत. सेवा रस्ता आरक्षित केल्यास, जिन्यांच्या ठिकाणी बॉटलनेक होऊन मोठी कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
२. वाहतूक नियमानुसार अवजड वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे सेवा रस्ता मुख्य मार्गात विलीनीकरण केल्यानंतर अवजड वाहने डाव्या बाजूने म्हणजे पूर्वीच्या सेवा रस्त्यावरून जाणे अपेक्षित आहे; पण आता मेट्रो स्थाकांसाठी अवजड वाहनांना या मार्गिकेवर बंदी असणार आहे.
३. अवजड वाहने जर मुख्य रस्त्यावरूनच धावणार असतील आणि इतर वाहनांना विलीनीकरण केलेल्या सेवा रस्त्यांवर बंदी असेल तर रुंदीकरणाचा उपयोग काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
४. मुख्य रस्ता व सेवा रस्ता विलीनीकरणामुळे घोडबंदर रोड दोन्ही बाजूने एकदिशा मार्ग होणार असल्याने ठाण्याकडे किंवा बोरिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा वळसा घालून जाणे भाग पडणार आहे, त्यामुळे वेळ व इंधनही वाया जाणार आहे.
५. मेट्रो स्थानकाच्या जिन्याशेजारी पर्यायी प्रवासी थांबे तयार केले जाणार आहेत. येथून पुढे प्रवास करण्यासाठी रिक्षा, बस, टॅक्सीचे थांबे असतील अशी प्राथमिक योजना आहे; पण मार्गिकेवर स्थानकच जर उजव्या बाजूला असेल तर नियमानुसार डाव्या बाजूला थांबे असणे बंधनकारक आहे. असे केल्यास थांब्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना रस्ता ओलांडावा लागणार आहे.
सेवा रस्ते कायम ठेवा
शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर नरेश मणेरा यांनी म्हटले, की मेट्रो स्थानकांच्या जिन्यांवर उतरत असलेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबे तयार करण्याच्या योजनेमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा. घोडबंदर रस्त्याच्या विलीनीकरणासाठी सेवा रस्ते विलीन करण्याचा प्रयोग अपयशी ठरला असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सेवा रस्ते कायम ठेवण्याची गरज आहे.
मेट्रो स्थानकांची संख्या
कापूरबावडी ते गायमुख : आठ स्थानके
दोन्ही बाजूंचे उतरते जिने : २८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.