राज्यात सप्टेंबर अखेर ५ हजार मेगावॉटचे सौर कृषी फिडर कार्यान्वित होणार

राज्यात सप्टेंबर अखेर ५ हजार मेगावॉटचे सौर कृषी फिडर कार्यान्वित होणार

Published on

कृषिपंपांना दिवसा वीज
अंतिम टप्प्यातील कामे बाकी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर प्रकल्प उभारले जात आहेत. त्यानुसार या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरअखेरी एकूण पाच हजार मेगावाॅटचे सौर प्रकल्प कार्यन्वित होणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात सुमारे १,८०० मेगावाॅटच्या प्रकल्पातून वीजनिर्मिती होत आहे, तर दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरपर्यंत जवळपास ३,८०० मेगावाॅट क्षमतेचे प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. राज्यात २०१८मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली आहे. त्यानुसार वीज उपकेंद्राच्या परिसरात २-१० मेगावाॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारून तेथे तयार होणारी वीज उपकेंद्राच्या माध्यमातून दिवसा कृषी फिडरला पुरवली जात आहे. सुरुवातीला जागेच्या उपलब्धतेमधील अडथळ्यांमुळे केवळ १,८०० मेगावाॅटचे वीज प्रकल्प कार्यन्वित झाले आहेत; मात्र आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत ३,८०० मेगावाॅटचे सौर प्रकल्प उभारले असून ते कार्यान्वित करण्याबाबतची अंतिम टप्प्यातील कामे बाकी आहेत. त्यानुसार पुढील दीड महिन्यात पूर्ण करून आवश्यक असलेली ग्रीड कनेक्टिव्हिटी, कंपाउंडची कामे पूर्ण करून प्रत्यक्ष वीजनिर्मिती करावी, असे निर्देश ऊर्जा विभागाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
...
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- सर्वाधिक क्षमता असलेले देशातील सर्वांत मोठे विक्रेंद्रित सोलर पार्क
- सौर प्रकल्पातील सौर पॅनेलची चोरी होऊ नये म्हणून निवडक ठिकाणी सीसीटीव्हींचा वाॅच
- उत्तर प्रदेश आणि गुजरातकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे अनुकरण
- सौर कृषी वाहिनीमुळे शेतकऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या राॅकेल, डिझेलवरील पंपाच्या वापरात घट

Marathi News Esakal
www.esakal.com