विक्रोळीत भाजपाला खिंडार
विक्रोळीत भाजपला खिंडार
७० कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सुमारे ७० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. स्थानिक पातळीवर निष्ठावंतांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना पदे दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकला. पालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना भाजपचे पदाधिकारी जाण्याने पक्षाला खिंडार पडले आहे.
विक्रोळी भाजप वॉर्ड क्रमांक ११८चे अध्यक्ष आणि भाजपच्या चित्रपट नाट्य आघाडीचे महासचिव यशवंत कुटे, विक्रोळी विधानसभेचे सहकार आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळे, माजी भाजप युवा मोर्चा महामंत्री लक्ष्मण येरम यांच्यासह ७० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. ७) विक्रोळी जनता मार्केट येथे झालेल्या एका समारंभात शिवसेनेत प्रवेश केला. माजी महापौर आणि शिवसेनेचे नेते दत्ता दळवी तसेच माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. ‘आम्ही स्थानिक पातळीवर पक्ष वाढविला. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला स्थानिक पातळीवर मताधिक्य मिळाले ते आमच्यामुळेच मिळाले. असे असताना पक्षात निष्ठावंतांना डावलले जात आहे. बाहेरून येणाऱ्यांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला,’ असे वॉर्ड अध्यक्ष यशवंत कुटे यांनी सांगितले.