रानभाज्या महोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक

रानभाज्या महोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक

Published on

रानभाज्या महोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे प्रतिपादन

डोंबिवली, ता. ११ (बातमीदार) : रानभाज्या महोत्सव हा आपल्या ग्रामीण संस्कृतीचा, आरोग्यदायी जीवनशैलीचा आणि स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा प्रतीक ठरत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते, हीच या उपक्रमाची खरी यशोगाथा असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे नुकतेच टेंभी नाका, ठाणे येथील बी. जे. हायस्कूलमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी घुगे म्हणाले, आपल्यापैकी अनेकांना काही रानभाज्यांची माहितीही नसते. अशा भाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि त्यांच्या उपयोगांची माहिती देणारे पुस्तक लवकरच प्रकाशित केले जाणार आहे. उमेद उपक्रमांतर्गत दरवर्षी ग्रामीण महिलांना रोजगार आणि उत्पन्नवाढीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. यंदा महोत्सवात २५ पेक्षा अधिक रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री झाली.

महोत्सवात जिल्ह्यातील डोंगरी व दुर्गम भागांतील नैसर्गिक पद्धतीने उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे सादरीकरण करण्यात आले. यासाठी ५० स्टॉल्सची मांडणी करण्यात आली होती, ज्यामध्ये १०० स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे एकूण ६३,१८० रुपये इतका नफा मिळाला असून, तो थेट महिलांच्या हाती गेला. यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण साधले गेले, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली. या महोत्सवप्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्रशा.) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) प्रमोद काळे, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटिकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, तसेच कृषी विभाग, जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रानभाज्यांचे प्रदर्शन
महोत्सवात आघाडा, शेवळा, कुरकुरी भाजी, मायाळू, भारंग, कवळाकवळी, फोडी, दिडा भाजी, करटोली, टाकळा, शेवगा आदी औषधी व पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. भाज्यांची केवळ चव आणि पोषणमूल्यच नव्हे, तर रोगप्रतिकारक क्षमतेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे रानभाज्यांनी महोत्सवात आरोग्यदायीतेचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे वैभव प्राप्त करून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com