बदलापूरातून थेट कामोठेपर्यंत रेल्वे
पनवेल, ता. १० (बातमीदार)ः मध्य रेल्वे प्रशासनाकडून बदलापूर-कामोठे प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. या मार्गामुळे पनवेल-सीएसटी हार्बर मार्गिकेवरील प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडणार आहे.
कर्जत, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ, नेरळ परिसर विकसित होत आहे. नवनवीन गृहप्रकल्प आले आहेत. कल्याण-शिळ रस्त्यावरील पलावा वसाहतीचे नेरळच्या दिशेने विस्तारीकरण होत आहे; पण मुंबईला रेल्वेने जाण्यासाठी कल्याण, ठाणे हा एकमेव रेल्वेमार्ग आहे. या गर्दीच्या विभाजनासाठी कल्याण ते मुंबई रेल्वेमार्गाला पर्याय म्हणून बदलापूर- कासगाव- पनवेलपर्यंतच्या ३४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी कासगाव येथे रेल्वेस्थानक उभारणीसाठीचे नियोजन केले जात आहे. या मार्गामुळे कर्जत, बदलापूर, अंबरनाथकरांना नवा पर्याय मिळणार आहे; पण पनवेल, नवी मुंबईतील स्थानकांवर गर्दी वाढणार आहे.
-----------------------------------
फेऱ्यांमध्ये तफावत
- नवी मुंबई, पनवेल परिसराची लोकसंख्या ६० लाखांवर गेली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पुष्पकनगर, नैना विकसित होत आहेत. भविष्यात नवी मुंबई दक्षिण आणि उत्तरेकडील लोकवस्ती एक कोटीच्या घरात पोहोचणार आहे.
- पनवेल- सीएसएमटी मार्गिकेवरील प्रवासी आणि लोकलच्या फेऱ्यांमध्ये तफावत आहे. गर्दीच्या वेळेत या मार्गावरून धीम्या गाड्या धावतात. जलद लोकल सेवा सुरू झालेली नाही, त्यामुळे बदलापूरवरून प्रवास सुरू झाल्यास ट्रेनमध्ये गर्दी वाढणार आहे.